सातारा : किसन वीर कारखान्याची डिस्टिलरी बीओटी तत्त्वावर देण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 03:05 PM2018-09-25T15:05:31+5:302018-09-25T15:15:34+5:30
किसन वीर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत गुरुवार, दि. २७ सप्टेंबर रोजी डिस्टिलरी बीओटी तत्त्वावर देणे व मर्यादेपेक्षा १५0 कोटी रुपयांचे अधिकचे उचलेल्या कर्जाला सभासदांची मान्यता घेण्याच्या विषयांना आपला विरोध असेल, असा आरोप कारखान्याचे ज्येष्ठ सभासदांनी केला आहे.
सातारा : किसन वीर कारखान्याची सर्वसाधारण सभा गुरुवार, दि. २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. डिस्टिलरी बीओटी तत्त्वावर देणे व मर्यादेपेक्षा १५0 कोटी रुपयांचे अधिकचे उचलेल्या कर्जाला सभासदांची मान्यता घेण्याचे विषय या सभेच्या विषयपत्रिकेत घेण्यात आले आहेत.
व्यवस्थापन व संचालक मंडळ यांच्या आर्थिक पापात सभासदांना गोवण्याचा उपदव्याप सुरु आहे, असा आरोप कारखान्याचे ज्येष्ठ सभासद बाबासाहेब कदम, राजेंद्र शेलार, बाबुराव शिंदे, धर्मराज जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत केला. या विषयांना आपला विरोध असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
किसन वीर व्यवस्थापनाने सादर केलेल्या अहवालानुसार कारखान्याची चालू देणी ६२९ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहेत. चालू येणी ४२0 कोटींच्या आसपास आहेत. यातील तफावत २१0 कोटी रुपयांची आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त देणे दिसत असल्यामुळे भविष्यात कारखान्याच्या स्थावर मालमत्तेलाही धोका पोहोचू शकतो, अशी भीती या सभासदांनी यावेळी व्यक्त केली.
अस्तित्वात असलेली डिस्टिलरी कोणाच्यातरी घशात घालण्याचा डाव रचण्यात आला आहे. किसन वीर कारखान्याने इतर कारखाने चालवायला घेऊन आधीच कर्जाचा डोंगर करुन ठेवला आहे.
किसनवीर-खंडाळा उद्योगातील डिस्टलरी बीओटी तत्त्वावर उभारण्याचा प्रस्ताव होणाऱ्या सभेत ठेवण्यात आला आहे. या कारखान्याची डिस्टिलरी बीओटी तत्त्वावर उभारण्याचा प्रस्ताव म्हणजे तुघलकी कारभाराचा नमुनाच आहे.
कारखान्याची बाहेरुन कर्ज मर्यादा वाढवून घेण्याबाबत वार्षिक सभेपुढे विषय आहे. १५0 कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज या कारखान्याने उचलले आहे.
कायदा व पोटनियम पायदळी तुडविण्यात आले आहे. याला सभेमध्ये सर्व सभासदांची मंजुरी घेऊन सभासदच अडचणीत येवू शकतात, असेही या सभासदांनी स्पष्ट केले. किसन वीर साखर कारखान्याने अद्यापही एफआरपीनुसार ऊसाचे बिल सभासदांना दिलेले नाही. आता नव्याने आयडीबीआय बँकेत खाते काढण्याबाबत सांगितले जात आहे. यातून शेतकरी सभासदच अडचणीत आणण्याचा डाव असल्याचा आरोपही कदम, शेलार, शिंदे, जगदाळे यांनी केला.
किसन वीरच्या साखर निर्मितीचा खर्च सह्याद्री कारखान्याच्या दुप्पट
एक क्विंटल साखर निर्मिती करण्यासाठी कऱ्हाड तालुक्यातील सह्याद्री कारखान्याला १0२८ खर्च करतो, त्याच ठिकाणी किसन वीर साखर कारखाना २१९६ रुपये खर्च करतो. त्यामुळे किसन वीर साखर कारखाना साखर निर्मितीसाठी लागणारे साहित्य सोन्या, रुप्याचे वापरतो की काय? असा सवालही या सभासदांनी उपस्थित केला.