सातारा : पाचवड-पाचगणी मार्ग खचला, वाहतूक धोकादायक, पावसाची संततधार सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 03:03 PM2018-07-17T15:03:53+5:302018-07-17T15:07:22+5:30
जावळीत पावसाची संततधार गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असल्यामुळे मंगळवारी पाचवड-पाचगणी या मुख्य रस्त्याला आखाडे गावाजवळ रस्ता खचला असून, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक झाली आहे.
सायगाव : जावळीत पावसाची संततधार गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असल्यामुळे मंगळवारी पाचवड-पाचगणी या मुख्य रस्त्याला आखाडे गावाजवळ रस्ता खचला असून, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक झाली आहे.
या ठिकाणी तीव्र उतार असून, यापूर्वीच याठिकाणी रस्ता खचला होता. याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर अतिपावसात हा रस्ता एका बाजूने पूर्ण खचला गेला आहे. याला केवळ बांधकाम विभागच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून जावळीत पावसाने उघडीप न दिल्यामुळे शेतीची कामे रखडली आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने दोन दिवस मुसळधार झालेल्या पावसाने मानकरवाडी येथील सखाराम जाधव यांच्या राहत्या घराची भिंत पडून नुकसान झाले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र जाधव यांच्या घराचे मोठे नुकसान झाले.
या मुसळधार पावसाचा फटका सायगाव, केळघर, कुडाळ, मेढा, बामणोली परिसराला बसला असून, मोठमोठे ओढे, नाले भरून वाहू लागल्याने ओढ्यांमधील पाणी शेतात घुसून शेतकºयांच्या शेतीपिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
मंगळवारी सकाळी पाचवड-पाचगणी या मुख्यरस्ता आखाडे गावाजवळ एका बाजूने पूर्ण खचला गेल्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. पर्यटनस्थळ पाचगणीकडे जाणारा हा मुख्य रस्ता असूनदेखील केवळ बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळेच हा रस्ता खचला गेला आहे. यापूर्वीच बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती केली असती तर हा रस्ता खचला गेला नसता.
परिसरातील नागरिकांनी यापूर्वीच बांधकाम अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती, तरीदेखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर या रस्त्यावर हजारो खड्डे देखील पडले आहेत
त्यातच आखाडेजवळ रस्ता खचल्याने या रस्त्यावरून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे.