सातारा : चालत्या बसमध्ये प्रवाशाला हृदयविकाराचा झटका, जिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 05:25 PM2018-03-16T17:25:57+5:302018-03-16T17:25:57+5:30
कऱ्हाड ते सातारा एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. बस चालकाने प्रसंगावधान राखत भरधाव वेगाने बस जिल्हा रुग्णालयात आणून प्रवाशावर तातडीने उपचार केले.
सातारा : कऱ्हाड ते सातारा एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. बस चालकाने प्रसंगावधान राखत भरधाव वेगाने बस जिल्हा रुग्णालयात आणून प्रवाशावर तातडीने उपचार केले.
याबाबत माहिती अशी की, भीमराव शामराव वास्के (रा. काले, ता. कऱ्हाड ) हे सातारा येथील एका महाविद्यालयात नोकरी करतात. नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कऱ्हाड येथील कोल्हापूर नाक्यावर थांबले होते. दरम्यान, ठाणे आगाराची गलमेवाडी ते ठाणे जाणाऱ्या बसमध्ये (एम एच १४ बीटी ३९३४) साताऱ्याला येण्यासाठी बसले.
वास्के हे बसच्या सीटवर बसल्यानंतर साताऱ्यातील पोवई नाका परिसरात त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते बेशुद्ध झाले. ही बाब बसमधील इतर प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बसचे वाहक पंढरीनाथ शेळके व चालक महेंद्र पिसाळ यांना माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून चालक पिसाळ यांनी प्रसंगावधान राखत बस थेट जिल्हा रुग्णालयातच नेली. त्यामुळे वास्के यांना तातडीचे उपचार मिळाले. या घटनेची माहिती मिळताच सातारा आगाराचे सहायक वाहतूक निरीक्षक सुधीर बारटक्के यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.