सातारा : दिखाऊच्या सिलिंडरमुळे प्रवाशांचा जीव आॅक्सिजनवर, महामंडळाच्या बसमध्ये अग्निसुरक्षा केवळ नावापुरतीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 04:48 PM2018-01-11T16:48:12+5:302018-01-11T17:03:25+5:30
प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्यां एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. अपघातसमयी तातडीची सुरक्षा म्हणून लांब पल्ल्याच्या बसमध्ये अग्निसुरक्षा यंत्र बसविण्यात आली आहेत; मात्र ती केवळ नावापुरतीच उरल्याचे दिसून येते. महामंडळाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
खंडाळा : प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्यां एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. अपघातसमयी तातडीची सुरक्षा म्हणून लांब पल्ल्याच्या बसमध्ये अग्निसुरक्षा यंत्र बसविण्यात आली आहेत; मात्र ती केवळ नावापुरतीच उरल्याचे दिसून येते. महामंडळाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
लांबच्या प्रवासासाठी आणि वेळेवर पोहोचण्यासाठी अनेक प्रवाशांचा ओढा एसटी बसकडे असतो. यामागे एसटी महामंडळाची सुरक्षित प्रवासाची हमी असते. शिवाय एखाद्या बसचा वाटेत काही बिघाड झाला तर लगेच दुसऱ्या बसची सोय केली जाते.
प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी बसमध्ये विविध योजना केलेल्या असतात. लांब पल्ल्याच्या एसटी गाडीत अचानक आगीच्या दुर्घटना घडल्या तर त्यापासून बचाव व्हावा, यासाठी अग्निशमन यंत्र बसवलेले असते. मात्र, बहुतांशी गाडीतील ही यंत्रे रिफील केल्याचे दिसून येत नाही.
काही बसमध्ये केवळ रिकामेच सिलिंडर ठेवलेले आढळून येतात. त्यामुळे अशा बसमधून प्रवाशांची सुरक्षा बेभरोसी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे हा केवळ दिखावा असू नये, अशी अपेक्षा प्रवाशांची असते .