साताऱ्यात सहा महिन्यानंतर वाटाण्याला उच्चांकी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:44 AM2021-05-25T04:44:43+5:302021-05-25T04:44:43+5:30

सातारा : मागील काही महिन्यांपासून पालेभाज्यांचा दर गडगडला असलातरी वाटाण्याला सहा महिन्यानंतर उच्चांकी दर मिळाला आहे. सातारा बाजार समितीत ...

Satara peaks after six months | साताऱ्यात सहा महिन्यानंतर वाटाण्याला उच्चांकी दर

साताऱ्यात सहा महिन्यानंतर वाटाण्याला उच्चांकी दर

Next

सातारा : मागील काही महिन्यांपासून पालेभाज्यांचा दर गडगडला असलातरी वाटाण्याला सहा महिन्यानंतर उच्चांकी दर मिळाला आहे. सातारा बाजार समितीत क्विंटलला १० हजार रुपयांपर्यंत दर आला. यामुळे शेतकऱ्यांत आनंद असतानाच मंगळवारपासून कडक निर्बंधामुळे जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा आनंद औटघटकेचाच ठरणार आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून शेतीमाल येतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात आवक होते. बाजार समितीत कांदा आणि बटाटा अधिक प्रमाणात येतो. सातारा बाजार समितीत सोमवारी कांद्याची ३०८ क्विंटल आवक झाली. कांद्याला क्विंटलला ३०० पासून १४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. कांद्याच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढ झाली आहे.

सातारा बाजार समितीत सोमवारी ३०७ वाहनांतून ९१५ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. बटाटा २३०, लसूण २० आणि आल्याची ८ क्विंटलची आवक झाली. तसेच फळांचीही काही प्रमाणात आवक राहिली. बाजार समितीत गवारला १० किलोस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. गवारचा दर अजूनही तेजीत आहे. तसेच शेवगा शेंगला ३०० ते ४०० पर्यंत दर आला. शेवगा शेंगेच्या दरात सुधारणा झाली. तर वांग्याला १० किलोला २०० ते ३०० रुपये दर मिळाला. टोमॅटो १०० ते १५०, कोबीला ८० ते १०० रुपये भाव आला. टोमॅटो व कोबीला दर अजुनही कमीच मिळत आहे. तर फ्लॉवरला १० किलोला २०० ते २५० अन् दोडक्याला ४०० ते ५०० रुपये भाव आला.

बटाट्याला क्विंटलला १४०० पासून १६०० रुपयांपर्यंत दर मिळाला. बटाट्याचा दर स्थिर राहिला आहे. हिरव्या मिरचीला २ ते ३ हजारापर्यंत भाव आला. आल्याला १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. आले दरात पुन्हा उतार आला आहे. तर लसणाला क्विंटलला ८ हजारापर्यंत भाव आला. लसणाचा दरही पुन्हा थोडा वाढला आहे. विशेष म्हणजे वाटाण्याला भाव कमी होता. मात्र, दीड महिन्यापासून दरात सुधारणा झाली. सोमवारी तर सहा महिन्यांतील उच्चांकी दर मिळाला. क्विंटलला १० हजारापर्यंत भाव आला. अजूनही दरात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

चौकट :

आजपासून बाजार समित्या बंद...

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी कडक निर्बंध घातले आहेत. याची अंमलबजावणी मंगळवारपासून होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या १ जूनपर्यंत बंद राहणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना भाजीपालाच बाजार समितीत आणता येणार नाही. तसेच किरकोळ विक्रीही बंद आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

......................................................

Web Title: Satara peaks after six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.