सातारा : कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यास हजारचा दंड, कऱ्हाड पालिकेकडून कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 03:08 PM2018-06-06T15:08:31+5:302018-06-06T15:08:31+5:30
परदेशात उघड्यावर कचरा टाकल्यास तसेच साधे धूम्रपान केल्यास त्यास लगेच दंडाला सामोरे जावे लागते, हे ऐकले असेल. मात्र, हाच नियम आता कऱ्हाड पालिकेने शहरात लागू केलाय. पटत नाही ना, हे खरं आहे. ही कारवाई खूप दिवसांपासून केली जात आहे.
कऱ्हाड : परदेशात उघड्यावर कचरा टाकल्यास तसेच साधे धूम्रपान केल्यास त्यास लगेच दंडाला सामोरे जावे लागते, हे ऐकले असेल. मात्र, हाच नियम आता कऱ्हाड पालिकेने शहरात लागू केलाय. पटत नाही ना, हे खरं आहे. ही कारवाई खूप दिवसांपासून केली जात आहे.
नुकत्याच मे महिन्यात उघड्यावर कचरा टाकल्याप्रकरणी तीनजणांना कारवाईला सामोरं जावं लागलंय. तर बुधवारी कोल्हापूर नाक्यावर चौघा व्यापाऱ्यांनी कचरा टाकल्याप्रकरणी चारशे रुपये दंडही भरला. त्यामुळे यापुढे आता उघड्यावर कचरा टाकताना आढळणाऱ्यास थेट शंभर तसेच हजार रुपये दंड म्हणून भरावा लागणार आहे.
असा केला जाऊ शकतो दंड
पालिकेच्या कचराकुंड्याव्यतरिक्त उघड्यावर कचरा टाकताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र नगरपंचायती, नगरपरिषद आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ कलम २३१ नुसार कारवाई केली जाऊ शकते. कचरा टाकण्यात आलेल्या व्यक्तीवर कारवाई करीत त्याच्याकडून एक हजार रुपये दंडाची रक्कम आकारण्यात येईल, अशी तरतूद या कलमामध्ये करण्यात आलेली आहे.
कारवाईसाठीचे पथक
शहरात पालिकेतील प्रभागांसह वाढीव हद्दीत व सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर व नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर तसेच उघड्यावर शौचालयास बसणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार आहे. यासाठी पालिकेतील एकूण नऊ मुकादम आणि त्यांच्याअंतर्गत अठरा कर्मचारी असे पथक यापूर्वीच तयार करण्यात आले आहे. या पथकाचे प्रमुख रफिक भालदार, मिलिंद शिंदे, देवानंद जगताप, मारुती काटरे, रोहित आतवाडकर, शेखर लाड हे असून, यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांकडून थेट कारवाई केली जात आहे.
कऱ्हाड शहरात कोठेही कचरा पडू नये म्हणून पालिकेकडून घरोघरी डस्टबीन वाटप करण्यात आले आहेत. तसेच व्यापाऱ्यांचा कचरा हा दरारोज पालिकेच्या ट्रॅक्टरमधून सकाळी व रात्री गोळा केला जातोय. तरीही उघड्यावर कोणी कचरा टाकताना आढळ्यास व्यावसायिक तसेच नागरिकांवर थेट कारवाई केली जात आहे.
-देवानंद जगताप
प्रभारी स्वच्छता निरीक्षक, आरोग्य विभाग
कऱ्हाड पालिका