सातारा : तडीपार आरोपी पिंटू बुधावले पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:52 PM2018-04-20T13:52:32+5:302018-04-20T13:52:32+5:30
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केलेला तडीपार आरोपी पिंटू उर्फ दीपक सर्जेराव बुधावले (रा. अपशिंगे, नवलेवाडी ता. कोरेगाव) याला रहिमतपूर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे सव्वासहाच्या सुमारास सापळा रचून अटक केली. ही कारवाई अपशिंगे येथील घाडगे वस्तीवर केली.
रहिमतपूर (सातारा) : हद्दपार आदेशाचे उल्लंघन केलेला तडीपार आरोपी पिंटू उर्फ दीपक सर्जेराव बुधावले (रा. अपशिंगे, नवलेवाडी ता. कोरेगाव) याला रहिमतपूर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे सव्वासहाच्या सुमारास सापळा रचून अटक केली. ही कारवाई अपशिंगे येथील घाडगे वस्तीवर केली.
याबाबत माहिती अशी की, पोलिसांनी दाखल केलेल्या विविध गुन्ह्यांत अपशिंगे (नवलेवाडी) येथील तडीपार आरोपी पिंटू उर्फ दीपक सर्जेराव बुधावले याला २६ जानेवारी २०१७ रोजी सातारा, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. तडीपारीच्या आदेशाचे यापूर्वीही उल्लंघन केल्याने रहिमतपूर पोलिसांनी त्याला पकडण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी झाला होता.
पिंटू आपल्या गावी राहत्या घरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, मंगळवार, दि. ३ रोजी पहाटे छापा टाकण्यासाठी गेलेल्या रहिमतपूर पोलिसांवर बुधावले परिवाराने दगड व ढेकळाने हल्ला केला. त्यात तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. या गोंधळाचा फायदा घेऊन आरोपी दुसऱ्यांदा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होेता.
तो अपशिंगे येथील घाडगे वस्तीवर झोपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, आरोपी वारंवार चकमा देत असल्याने साहायक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच नियोजनबद्ध छापा टाकून बुधावले याला झोपेतच ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलीस हवालदार प्रकाश इंगळे, विजय जाधव, रवींद्र कापले, पोलीस नाईक जगदीश कणसे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राठोड, सागर भुजबळ, समाधान निकम, सागर पाटील, आरती यादव, शिल्पा जाधव, नीता घाडगे आदींनी सहभाग घेतला.