सातारा : रात्रीस खेळ चाले ; तळ गाठलेल्या तलावातूनही पाण्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 04:47 PM2018-05-26T16:47:14+5:302018-05-26T16:47:14+5:30
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागाला वरदान ठरणारा देऊर-तळिये गावाच्या सीमेवरील तळहिरा पाझर तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. धरणात केवळ पाच टक्के पाणी शिल्लक असले तरी काही लोक पाईपलाईन टाकून रात्रीच्या वेळी पाण्याची चोरी करत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन तलावाची पहाणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागाला वरदान ठरणारा देऊर-तळिये गावाच्या सीमेवरील तळहिरा पाझर तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. धरणात केवळ पाच टक्के पाणी शिल्लक असले तरी काही लोक पाईपलाईन टाकून रात्रीच्या वेळी पाण्याची चोरी करत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन तलावाची पहाणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
गतवर्षी पडलेला अत्यल्प पाऊस आणि तळहिरा तलावावर असलेल्या ओढ्यावर जलयुक्त बंधारे झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तळहिरा तलाव कधीच शंभर टक्के भरला नाही. गतवर्षी या तलावात केवळ पन्नास टक्के पाणीसाठा झाला होता.
देऊर-तळिये व वाठार स्टेशन गावांचा पाणीप्रश्न तळहिरा तलावावर अवलंबून आहे. त्यामुळे या तलावात मृतसाठ्यापेक्षाही कमी पाणीसाठा उपलब्ध असतानाही या तलावात दिवस-रात्र मोटारीद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी केली जात आहे. संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारीही कोणतीच कारवाई करत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
शेतापर्यंत बंदिस्त पाईपलाईन
या तलावात जिथं पाणीसाठा आहे. तिथपर्यंत विद्युत मोटारी टाकण्यात आल्या आहेत. काहींनी तर चक्क धरणातून बंदिस्त पाईपलाईनद्वारा हे पाणी शेतापर्यंत पोहोचविण्याचे काम केले असल्याने या तलावातील पाणी चोरी रोखणे हेच मुख्य आव्हान आहे.