बंगळुरूमध्ये ट्रॅफिक जाम करून सातारा पोलिसांनी सराईत आरोपीला पकडले, पाच वर्षांपासून फरार

By दत्ता यादव | Published: July 15, 2024 03:37 PM2024-07-15T15:37:20+5:302024-07-15T15:38:21+5:30

ओळख लपविण्यासाठी पेहराव बदलला, फसवणूक प्रकरणात एका महिलेसह चौघांना अटक

Satara Police arrested the accused in Sarai after creating a traffic jam in Bangalore | बंगळुरूमध्ये ट्रॅफिक जाम करून सातारा पोलिसांनी सराईत आरोपीला पकडले, पाच वर्षांपासून फरार

बंगळुरूमध्ये ट्रॅफिक जाम करून सातारा पोलिसांनी सराईत आरोपीला पकडले, पाच वर्षांपासून फरार

सातारा : सराईत आरोपीला पकडण्यासाठी सातारा पोलिसांनी बंगळुरूमध्ये जाऊन अनोखा ट्रॅप लावला. महामार्गावरून कारने जाणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी चक्क सातारा पोलिसांनी मुद्दामहून ट्रॅफिक जाम केले. त्यामुळे सराईत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला. त्याच्या चाैकशीतून पुढे आणखी तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.

विनायक शंकर रामुगडे (वय ४४, रा. ओगलेवाडी, ता. कऱ्हाड), कलावती ऊर्फ प्रिया रामचंद्र चव्हाण (४३, मूळ रा. कोरेगाव, सध्या रा. शाहूनगर, गोडोली, सातारा) तसेच या दोघांना मदत करणाऱ्या अनुजा मंगेश जाधव (२६, रा. चंदननगर, कोडोली), कुणाला अमर भांडे (२४, रा. शाहूनगर, गोडोली, सातारा), अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी करण्यात आली असून तेथील वाईन शाॅप, देशी दारूचे लायसन्स हे मंत्रालयातील अधिकारी यांच्या ओळखीने इतर ठिकाणी ट्रान्सफर करून देतो, असे सांगून विनायक रामुगडे याने प्रिया चव्हाण हिच्या मदतीने साताऱ्यातील एका व्यावसायिकाला ७५ लाखांचा गंडा घातला होता. एवढेच नव्हे तर कोरेगाव, पुणे, मुंबईसह परराज्यांतही अशाच पद्धतीने या बंटी-बबलीने अनेकांना कोट्यवधींना फसविल्याचे समोर आले. सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे पथक त्यांचा शोध घेत होते. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

तो कधी हैदराबाद, आंध्र प्रदेश तर कधी बंगळुरू येथे वावरत होता. याची माहिती डीबी पथकाला मिळाली. पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, अविनाश गवळी, हवालदार नीलेश यादव, सुजित भोसले, नीलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, इरफान मुलाणी यांचे पथक बंगळुरूला गेले. तेथे रामुगडे याचा पोलिसांनी चार दिवस कसून शोध घेतला. तेव्हा तो कारने जाणार असल्याचे पोलिसांना समजले. 

यानंतर पोलिसांनी तत्काळ प्लॅन तयार करून एका ठिकाणी महामार्गावर ट्रॅफिक जाम केले. त्याच्या वाहनाच्या मागे व पुढे पोलिसांनी खासगी वाहने लावून अखेर त्याला पकडून ताब्यात घेतले. त्याला साताऱ्यात आणल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चाैकशी केली. त्यावेळी त्याच्यासोबत काम करणारी प्रिया चव्हाण ही पुण्यात असल्याचे पोलिसांना समजले. एका पथकाने पुण्यात जाऊन प्रिया चव्हाण हिला अटक केली. या बंटी-बबलीला मदत करणारे अनुजा जाधव आणि कुणाला भांडे या दोघांनाही पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली. ही थरारक कारवाई तडीस नेल्याने पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी डीबी पथकाचे काैतुक केले.    

ओळख लपविण्यासाठी पेहराव बदलला..

आरोपी विनायक रामुगडे हा पोलिसांना चकवा देण्यासाठी नाव बदलून, बनावट ओळखपत्र वापरायचा. वेगवेगळ्या प्रकारची दाढी ठेवायचा. तसेच केसांचा विग वापरून तो ओळख लपवायाचा. दुसऱ्या वाहनांचे नंबर त्याच्या कारला लावायचा. सीमकार्ड काही कालावधीसाठी वापरून पुन्हा फेकून द्यायचा. सध्या या बंटी-बबलीकडून १० मोबाइल, बरीच सीमकार्ड, केसांचा विग पोलिसांनी जप्त केला आहे.

Web Title: Satara Police arrested the accused in Sarai after creating a traffic jam in Bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.