तरुणाच्या खून प्रकरणात संशयिताला सातारा पोलिसांनी उचलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 05:51 PM2017-11-07T17:51:28+5:302017-11-07T17:54:08+5:30
सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्याच्या मध्यावर झालेल्या तरुणाच्या खूनप्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. तर दोघांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. यामधील आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. रात्री उशिरा मृतदेह किल्ल्यावरून खाली आणून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
सातारा ,दि. ०७ : येथील अजिंक्यतारा किल्ल्याच्या मध्यावर झालेल्या तरुणाच्या खूनप्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. तर दोघांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. यामधील आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत.
येथील अजिंक्यतारा किल्ल्याच्या डबी नावाच्या शिवारात लक्ष्मण विठ्ठल माने (वय ३३, रा. माची पेठ, सातारा) व इतर तिघेजण सोमवारी दुपारच्या सुमारास पार्टी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मद्यप्राशन केल्यानंतर जुन्या भांडणाच्या कारणातून लक्ष्मण माने याला दगडाने ठेचून मारण्यात आले. रात्री उशिरा माहिती मिळाल्यानंतर पोलिस अंधारात बॅटरीच्या उजेडात घटनास्थळी पोहचले. त्यानंतर रात्री उशिरा मृतदेह किल्ल्यावरून खाली आणून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीवरून अजय धोंडिबा कोकरे (रा. समर्थ मंदिर, बालाजी नगर सातारा), रोहित कोकरे व लवेश रामचंद्र जाधव (दोघेही रा. जानकर कॉलनी, सातारा) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. या खूनप्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. दोघांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.