सातारा : पोलिसांनी २२ जणांना आत्मदहनापासून केले परावृत्त, यंदाचा प्रजासत्ताकदिन आंदोलनाविना पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 04:11 PM2018-01-27T16:11:27+5:302018-01-27T16:22:06+5:30
स्वतंत्र्य दिन आणि प्रजासत्तादिन म्हटलं की, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन, उपोषण करणारांचा आकडा दरवर्षी वाढलेला पाहायला मिळतो. मात्र, यंदाचा प्रजासत्ताकदिन ना उपोषण ना आंदोलनाशिवाय पार पडला. जिल्ह्यातून तब्बल २२ जणांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, पोलिसांनी समन्वयकाची भूमिका पार पाडल्याने एकही आंदोलकाने आपला जीव धोक्यात घातला नाही.
सातारा : स्वतंत्र्य दिन आणि प्रजासत्तादिन म्हटलं की, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन, उपोषण करणारांचा आकडा दरवर्षी वाढलेला पाहायला मिळतो. मात्र, यंदाचा प्रजासत्ताकदिन ना उपोषण ना आंदोलनाशिवाय पार पडला. जिल्ह्यातून तब्बल २२ जणांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, पोलिसांनी समन्वयकाची भूमिका पार पाडल्याने एकही आंदोलकाने आपला जीव धोक्यात घातला नाही.
स्वतंत्र्य दिन आणि प्रजासत्ताकदिनी उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा देणारांची संख्या दर वर्षी वाढतच असते. त्याचे कारण म्हणजे. या दिवशी मंत्री,पालकमंत्री तसेच राजकीय नेते हजर असतात. आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत लक्ष वेधून घेण्यासाठी या दिवसांची अनेकजण निवड करतात.
महिनाभरापासून विविध विभागामध्ये प्रजासत्ताकदिनी आंदोलन करणार, अशा इशाऱ्यांचे निवेदन अनेकजण देत असतात. तशा प्रकारचे वृत्तही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असते. ऐकिकडे प्रजासत्ताकदिन साजरा होत असताना दुसरीकडे मात्र, पोलिसांना आत्मदहन करणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवावे लागते. सारा पोलिस फौजफाटा सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तैनात ठेवावा लागतो. दर वर्षी कोणी ना कोणी आत्मदहन आणि आंदोलन करतच असते. परंतु यंदाचा प्रजासत्ताक दिन या साऱ्या गोष्टीला अपवाद ठरला आहे.
जिल्ह्यातून २२ जणांनी आपल्या विविध मागण्यांसाठी प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता. पोलिसांच्या गोपनीय विभागाने या साऱ्या लोकांना भेटून त्यांचे मत परिवर्तन केले. एवढेच नव्हे तर त्यांच्या मागण्यासंदर्भात ज्या त्या अधिकाऱ्यांना त्यांना भेटवून समाधानकारक तोडगा काढला. त्यामुळे अनेकांनी आत्मदहन करण्याचा निर्णय मागे घेतला.
स्वत:च्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका, तुमचे काम परत केंव्हाही होईल, मात्र तुमचा जीव तुम्हाला परत मिळणार नाही. तुम्ही यातूनही प्रयत्न केला तर तुमच्यावर गुन्हे दाखल होणार. यातून मूळ काम बाजुला राहून दुसरीच कटकट तुमच्या मागे लागण्यापेक्षा संयमाने प्रशासनाकडून काम करून घ्या, अशा प्रकारचे सल्ले पोलिसांच्या गोपनीय विभागाने आंदोलनकर्त्यांना दिले.
त्यामुळे आंदोलनकर्त्यांनीही पोलिसांचा सल्ला ऐकून स्वत: जीव धोक्यात न घालण्याचा ठाम निर्णय घेतला. शहर पोलिस ठाण्याचे नारायण सारंगर तसेच गोपनिय विभागाचे अनिल पवार, राहुल खाडे, दीपक झोपळे आणि सचिन नवघणे या टीमने आंदोलनकर्त्यांना आत्मदहनापासून परावृत्त केले.