आधी पाणी मागितले, ग्लास फोडून स्वत:च्या गळ्यावर वार केले; सातारा पोलिस ठाण्यातील आरोपीचे कृत्य
By दत्ता यादव | Published: February 27, 2024 02:04 PM2024-02-27T14:04:03+5:302024-02-27T14:04:18+5:30
सातारा : तहान लागली म्हणून आरोपीनं पोलिसांकडे पाणी मागितलं. पोलिसांनी त्याला ग्लासमधून पाणी दिलं. पण तोच काचेचा ग्लास फोडून आरोपीनं काही क्षणात स्वत:च्या गळ्यावर वार केले. यात ...
सातारा : तहान लागली म्हणून आरोपीनं पोलिसांकडे पाणी मागितलं. पोलिसांनी त्याला ग्लासमधून पाणी दिलं. पण तोच काचेचा ग्लास फोडून आरोपीनं काही क्षणात स्वत:च्या गळ्यावर वार केले. यात संबंधित आरोपी जखमी झाला. ही धक्कादायक घटना सातारा तालुका पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शी उर्फ सूरज अनिल काळे (वय १९, रा. सांगळे वस्ती श्रीगोंदा, जि. अहमदनगर), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील एक व्यापारी डिसेंबर २०२३ मध्ये दुचाकीवरून सज्जनगडला निघाले होते. त्यावेळी त्यांना धाक दाखवून सूरज काळे याने त्यांच्या खिशातील १ लाख ५ हजारांची रोकड लंपास केली होती. या गुन्ह्यात सातारा शहर पोलिसांनी त्याला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. गेल्या काही दिवसांपासून तो जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
दरम्यान, याच गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सातारा तालुका पोलिसांनी सोमवारी दुपारी त्याला ताब्यात घेतले. दिवसभर त्याची चाैकशी तसेच कागदोपत्री सोपस्कार पार पाडले जात होते. पोलिस ठाण्यातील बीट अंमलदारांच्या शेजारील खोलीमध्ये त्याला ठेवण्यात आले होते. पोलिसांना त्याने पाणी पिण्यास मागितल्यानंतर त्याला ग्लासमधून पाणी देण्यात आले.
मात्र, पोलिसांची नजर चुकवून त्याने काचेचा ग्लास फरशीवर आपटला. त्यानंतर फुटलेल्या ग्लासच्या तुकड्याने त्याने स्वत:च्या गळ्यावर वार केले. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याच्या हातातून काचेचा तुकडा पोलिसांनी हस्तगत केला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी सकाळी त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले असून, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सध्या त्याला जिल्हा कारागृहात पुन्हा ठेवण्यात आले आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात रात्री अकरा वाजता सूरज काळे याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
ग्लास तातडीने बदलले
काचेच्या ग्लासने आरोपीने स्व:च्या गळ्यावर वार करून घेतल्याने पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांनी याची तातडीने दखल घेऊन पोलिस ठाण्यात काचेच्या ग्लास ऐवजी स्टीलचे ग्लास आणले.