सातारा : गर्भपात गोळ्या विक्रीप्रकरणी प्रवीण देशमुख गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:56 PM2018-03-30T12:56:33+5:302018-03-30T12:56:33+5:30
बेकायदा गर्भपात गोळ्या विक्रीप्रकरणातील सूत्रधार प्रवीण ऊर्फ बाळासाहेब तुकाराम देशमुख (वय ३८, रा. मंगळवार पेठ, सातारा) याला गुरुवारी रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.
सातारा : बेकायदा गर्भपात गोळ्या विक्रीप्रकरणातील सूत्रधार प्रवीण ऊर्फ बाळासाहेब तुकाराम देशमुख (वय ३८, रा. मंगळवार पेठ, सातारा) याला गुरुवारी रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.
याबाबत माहिती अशी की, अन्न व औषध प्रशासनाने कोंडवे, ता. सातारा येथील अजय प्रकाश सपकाळ याच्या राहत्या घरात छापा टाकून एमटीपी कीटच्या औषधांचा ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यामुळे साताऱ्यात बेकायदा गर्भपाताच्या गोळ्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात अजय सपकाळ, अमीर महामूद खान (कोंडवे), प्रशांत नामदेव शिंदे (रा. शाहूपुरी) व विलास पांडुरंग देशमुख (रा. मलकापूर, कऱ्हाड) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान हे चारही संशयित केवळ कर्मचारी असून, या रॅकेटमागे अनेकांचे हात असल्याचे स्पष्ट झाले.
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा साताऱ्यांतील औषधांचा होलसेल विक्रेता प्रवीण तुकाराम देशमुख याला अटक केली. त्यामुळे आता या रॅकेटमधील एजंट व विक्रेते जाळ्यात सापडण्याची शक्यता आहे.