सातारा : स्टेअरिंग जाम झाल्याने खासगी बस डिव्हायडरला धडकली, प्रवासी बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 03:42 PM2017-12-19T15:42:51+5:302017-12-19T15:47:59+5:30
कोल्हापूरहून बोरीवलेकडे निघालेल्या खासगी आराम बसचे स्टेअरिंग जाम झाल्याने चालकाचा ताबा सुटून गाडी थेट डिव्हायडरला धडकली. या अपघातात बसचे नुकसान झाले असून, प्रवासी मात्र बचावले आहेत. सातारा शहराजवळ महामार्गाच्या पुलावर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
सातारा : कोल्हापूरहून बोरीवलेकडे निघालेल्या खासगी आराम बसचे स्टेअरिंग जाम झाल्याने चालकाचा ताबा सुटून गाडी थेट डिव्हायडरला धडकली. या अपघातात बसचे नुकसान झाले असून, प्रवासी मात्र बचावले आहेत. सातारा शहराजवळ महामार्गाच्या पुलावर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रमोद शहाजी बाबर (वय २६, रा. बानुरगड, ता. खानापूर, जि. सांगली) हा कोल्हापूरहून बोरीवलीला खासगी आराम बस (जीजे ०३-९३९९) घेऊन चालला होता. सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास बस सातारा शहराजवळील शिवराज पेट्रोल पंपाजवळील पुलावर आली. त्यावेळी बसचे स्टेअरिंग जाम झाले.
त्यामुळे चालक बाबर याचे नियंत्रण सुटल्याने बस डिव्हायडरला जाऊन धडकली. त्यानंतर बसचा पुढील एक टायरही फुटला. या अपघातात बसचे नुकसान झाले असले तरी प्रवासी मात्र बचावले आहेत. कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.