सातारा : एकीकडे झाडांचे संवर्धन; दुसरीकडे वणवा, आगी लावण्याच्या घटनात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 03:58 PM2018-02-14T15:58:21+5:302018-02-14T16:00:16+5:30
प्रमुख पर्यटनस्थळ असणाऱ्या कास मार्गावरील गणेशखिंड पठार परिसरात गतवर्षी लावण्यात आलेल्या हजारो झाडांच्या संगोपनासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून पाणी घातले जात आहे. या झाडांच्या संवर्धनासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मात्र विघ्नसंतोषी लोकांकडून आगी लावण्याचा प्रकार होत आहे.
पेट्री : प्रमुख पर्यटनस्थळ असणाऱ्या कास मार्गावरील गणेशखिंड पठार परिसरात गतवर्षी लावण्यात आलेल्या हजारो झाडांच्या संगोपनासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून पाणी घातले जात आहे. या झाडांच्या संवर्धनासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मात्र विघ्नसंतोषी लोकांकडून आगी लावण्याचा प्रकार होत आहे.
देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या सातारा शहराच्या पश्चिमेकडील कास पठार परिसरात वारंवार लावण्यात आलेल्या वणव्याच्या आगीत आत्तापर्यंत शेकडो टन चारा नष्ट झाला आहे. तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांकडून लावण्यात आलेल्या वणव्याने कित्येक वृक्ष होरपळले गेले आहेत. वनसंपदेबरोबरच प्राणीही धोक्यात येऊ लागले आहेत. तसेच अनेक पशुपक्ष्यांच्या निवाºयाचा प्रश्नही निर्माण होऊ लागला आहे.
सामाजिक वनीकरण विभागाद्वारे या गणेशखिड परिसरात हजारोंच्या संख्येने पावसाळ्यात झाडे लावण्यात आली होती. या रोपांना महिन्यांतून दोनवेळा असे साधारण दर महिन्याला २२ टँकरद्वारे पाणी वृक्षसंगोपनासाठी घातले जात आहे.
अविवेकी मनोवृत्ती असणाऱ्यांकडून एका बाजूला हा परिसर भकास करण्याचेच काम सुरू आहे. तर दुसऱ्या बाजुला समाजिक संस्था, निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी तसेच प्रशासनाकडून जीवाचे रान करून वृक्षांचे रक्षण, संवर्धन करतानाचे चित्र दिसत आहे.
सध्यस्थितीला वातावरणात दुपारच्यावेळी उन्हाची तीव्रता जाणवत आहे. तसेच वणवा पेटविणाऱ्या विघ्नसंतुष्टी लोकांकडून झाडांचे संरक्षण करण्याची गरज आहे. ही जबाबदारी आपणा सर्वांवरच येऊन पडली आहे.
- ओम जाधव,
पर्यावरणप्रेमी