सातारा ते पुणे महामार्गाची लवकरच होणार दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:43 AM2021-09-26T04:43:10+5:302021-09-26T04:43:10+5:30

सातारा सातारा ते पुणे महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या महामार्गावरून प्रवास करणे वाहनचालक आणि प्रवाशांचा जीव टांगणीला ...

Satara to Pune highway to be repaired soon | सातारा ते पुणे महामार्गाची लवकरच होणार दुरुस्ती

सातारा ते पुणे महामार्गाची लवकरच होणार दुरुस्ती

Next

सातारा

सातारा ते पुणे महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या महामार्गावरून प्रवास करणे वाहनचालक आणि प्रवाशांचा जीव टांगणीला लावणारे आहे. अपघात आणि दुर्घटना टाळण्यासाठी महामार्ग आणि सेवा रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी आणि सातारा जिल्हावासीयांचे होणारी गैरसोय थांबवावी, अशी आग्रही मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार गडकरी यांनी महामार्ग दुरुस्तीसाठी ५० ते ५५ कोटी निधीची तरतूद केली असून येत्या तीनचार महिन्यात महामार्गाची दुरुस्ती करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दरम्यान, टोल नाक्यावर होत असलेले गैरप्रकार आणि झोल थांबविण्याबाबत ही शिवेंद्रसिंहराजे यांनी गडकरी यांना सांगितले असून लवकरच टोल नाका चालवणारा ठेकेदार बदलणार असल्याचे गडकरी यांनी शिवेंद्रसिंहराजे यांना सांगितले. सातारा- जावली मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी सी.आर.एफ. मधून निधी देण्याची मागणीही शिवेंद्रसिंहराजे यांनी केली असून याबाबतही गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

गडकरी कराड दौऱ्यावर आले असताना शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांची भेट घेतली आणि महामार्ग दुरुस्तीसंदर्भात खड्ड्यांच्या छायाचित्रांसहित लेखी निवेदन देऊन चर्चा केली. महामार्ग व सेवा रस्त्यांची दुरवस्था तसेच महामार्गावर कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नसताना टोल वसुली मात्र सक्तीने केली जाते. याशिवाय टोल नाक्यावर प्रशासकीय अधिकारी, आजीमाजी सैनिक आणि नागरिकांशी नेहमीच उद्धट वर्तन करुन शिवीगाळ दमदाटी करण्याचे प्रकार होत असतात. आनेवाडी टोलनाक्यावर मोठा भ्रष्टाचार झाला असून हे सर्व गैरप्रकार थांबवणे आवश्यक आहे. सातारा जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यात कुठेही जायचे असेल किंवा पुणे, मुंबईला जायचे असेल तर महामार्गावर यावेच लागते पण, महामार्गाची अक्षरशः चाळण झाल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. दररोज अनेक छोटेमोठे अपघात घडत असून अनेकजण जायबंदी होतात तर, वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीची गंभीर दाखल घेऊन येत्या तीन ते चार महिन्यात सातारा ते पुणे महामार्गाची दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन गडकरी यांनी शिवेंद्रसिंहराजे यांना दिले आणि तसे आदेश महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले.

Web Title: Satara to Pune highway to be repaired soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.