Satara: पुसेसावळीची दंगल अन् समाजभान

By दीपक शिंदे | Published: September 23, 2023 12:41 PM2023-09-23T12:41:41+5:302023-09-23T12:41:57+5:30

दीपक शिंदे, मुख्य उपसंपादक, सातारा आक्षेपार्ह पोस्टच्या कारणावरून पुसेसावळीत दंगल उसळली. त्यात एका निरपराध्याचा बळी गेला. अनेकजण जखमी होऊन ...

Satara: Pusesavali riots and social consciousness | Satara: पुसेसावळीची दंगल अन् समाजभान

Satara: पुसेसावळीची दंगल अन् समाजभान

googlenewsNext

दीपक शिंदे, मुख्य उपसंपादक, सातारा

आक्षेपार्ह पोस्टच्या कारणावरून पुसेसावळीत दंगल उसळली. त्यात एका निरपराध्याचा बळी गेला. अनेकजण जखमी होऊन जायबंदी झाले. घरांची तोडफोड आणि वाहनांची जाळपोळ झाली. पुसेसावळीतील घटनेचे पडसाद जिल्हा आणि राज्यभर उमटले. पण, ही दंगल राजकारण्यांनी फारशी गांभीर्याने घेतलीच नाही असे जाणवले. दंगलीनंतर आठ दिवस कोणी पुसेसावळीकडे फिरकलेच नाही. जसे काही होतेय ते होऊ दे, आपल्याला काय त्याचे, अशा प्रकारची भावना दिसली. पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी मात्र, रोज त्या परिसरात जाऊन शांततेचे आवाहन करत होते. समाजातील संपत चाललेल्या माणुसकीचा हा दृश्य परिणाम तर नाही ना, असे वाटू लागले आहे.

माणसा-माणसांमध्ये प्रेमभाव वाढावा यासाठी जातीव्यवस्था संपवून सर्व समाज एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. जातीव्यवस्था आता फार लोकांच्या मनात राहिलेली नाही. पण, काहींच्या डोक्यात आहे. त्यातूनच अनेकांची डोकी फिरवण्याचे काम काही महाभाग करत आहेत. विसरत चाललेले जात आणि धर्माचे मायाजाल पुन्हा टाकण्याचा काहींचा प्रयत्न यशस्वी होऊ लागला आहे. एखाद्याला लक्ष्य करुन त्याचा बीमोड करण्याची भावना वाढू लागली आहे. आतापर्यंत सुपारी देऊन आणि शस्त्रांच्या सहाय्याने एकमेकांवर हल्ले केले जात होते.

पण, आता सुपारी दिली जाते पण, ती सोशल माध्यमांची सुपारी असते. मोबाइल हे माध्यम आणि सोशल मीडिया हा त्यातील शस्त्र झाला आहे. या शस्त्राचा चुकीच्या पद्धतीने वापर करुन एकमेकांवर हल्ले करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होत आहे. डोकी भडकवून जीवघेण्या इतपत भावना भडकविल्या जात आहेत. त्या थांबविण्यासाठी राज्यातील सत्ताधारीही कमी पडत आहेत.

एखाद्या ठिकाणी दंगल उसळल्यानंतर तिथल्या लोकप्रतिनिधीने ताबडतोब उपस्थित राहून लोकांना आवाहन करण्याची आवश्यकता होती. पण, पुसेसावळी ज्या मतदारसंघात येते त्या मतदारसंघाचे आमदार दहा दिवसांनंतर मतदारसंघात गेले. पालकमंत्र्यांचीही तीच अवस्था. केवळ खासदार उदयनराजे भोसले यांच्यासारखा खासदार दंगल झाल्यानंतर काही तासांतच पुसेसावळीत पोहोचून लोकांना शांततेचे आवाहन करुन आले. इतरांमध्ये तेवढे धाडस नव्हते का?

का होत असलेल्या प्रकाराशी काही देणेघेणेच नव्हते. दंगलीत ज्यांच्या घरांचे नुकसान झाले, ज्यांच्या गाड्या जाळल्या गेल्या त्यांना किती नुकसानभरपाई मिळाली? त्यांना कोणी दिलासा दिला का? दंगलीत काही झाले तरी चालते का? ज्या निरपराध युवकाचा बळी गेला त्याच्या कुटुंबीयांना कोणी मदत केली का ? अजून तरी कोणी मदत केल्याचे ऐकिवात नाही. कोणी कशाला सरकारनेही अजून किती मदत देणार हे जाहीर केलेले नाही. देणार की नाही हे सुद्धा स्पष्ट नाही. एवढी अनास्था दाखविल्यानंतर कुटुंबीयांनी न्यायाची काय अपेक्षा करायची.

अनास्थेच्या या प्रकारात काही सामाजिक संघटना आक्रमक झाल्या. पण, त्यांनीही मोर्चासारखे हत्यार उगारायचे ठरविले. त्यातून पुन्हा ताणतणाव अधिकच वाढणार म्हटल्यावर त्यांच्यावरही बंदी आणली. पण, खऱ्या अर्थाने दंगलीच्या घटनेवर जर उपाय करायचा असेल तर त्यातील दंगलग्रस्तांना मदत करण्याची आवश्यकता आहे. जी कोणीही आतापर्यंत केली नाही. केवळ शाब्दिक आश्वासनावर विसंबून चूल चालणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या स्तरातून मदतीची गरज आहे. तरच त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी सहकार्य होईल.

कोणतीही गोष्टी पुढे पाठविण्यापूर्वी करा विचार ( थिंक )

आपल्या हातात असलेल्या मोबाइलवर शेकडो गोष्टी येत असतात. त्यातली आपण काही पाहतो, काही पाहत नाही आणि काही पाहून पुढे पाठवितो. पुढे पाठविताना काही गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे. आपण पुढे पाठवत असलेली गोष्ट खरी आहे का, त्यात सत्यता किती आहे, दुसरी गोष्ट समाजासाठी हानिकारक तर नाही ना ? तिसरी बाब त्यातून आपण कोणती माहिती प्रसारित करीत आहोत ? चौथी बाब त्यातून नकारात्मक भावना तर समाजात पसरणार नाहीत ना आणि पाचवी बाब त्यातून आपण पाठवत असलेल्या व्यक्तीला किंवा समाजाला काही चांगले ज्ञान मिळेल का ? या सर्वांचा विचार करा आणि मगच एखादी पोस्ट पुढे पाठवा.

Web Title: Satara: Pusesavali riots and social consciousness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.