Satara Rain: कोयना, उरमोडी, कण्हेर धरणातून पाणी सोडण्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 10:52 AM2021-07-22T10:52:25+5:302021-07-22T10:53:01+5:30
Heavy Raining in Satara: कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे.
सातारा: सातारा जिल्ह्यातील कोयना, उरमोडी आणि कण्हेर या धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. त्यामुळे आज दुपारपर्यंत या तीनही धरणातून पाणी सोडण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे. मागील १२ तासात धरणामध्ये ६.४७ टीएमसी पाण्याची आवक झाली असून धरणाची पाणी पातळी ७ फूट ५ इंच वाढली आहे. आज(दि.२२) सकाळी ५ वाजता धरणाची पाणी पातळी २,१२४ फूट ३ इंच झाली असून धरणामध्ये ६४.९८ टीएमसी (६२ %) पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमापक केंद्रामधील मागील १२ तासातील पर्जन्यमान खालीलप्रमाणे आहे.
कोयनानगर २५६ मि.मी.
नवजा ३०६ मि.मी.
महाबळेश्वर ३०३ मि.मी.
उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस असल्याने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. धरणातील पाणी पातळी निर्धारित पातळी पेक्षा अधिक होताच आज दुपारी १२ वाजलेनंतर केव्हाही नदीपात्रात सांडवा १,६१९ क्यूसेक व विद्युत गृहातून ५०० क्यूसेक असा एकूण २,११९ क्यूसेक विसर्ग उरमोडी नदीपात्रात सोडण्यात येईल. तसेच, पर्जन्यमान व आवक वाढल्यास विसर्गात वाढ करण्यात येईल याची उरमोडी नदीकाठावरील गावातील सर्व ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामस्थ , यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. कोणत्याही कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये.
कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने मागील चोवीस तासात ९२.०० मि.मी.पाऊस झाला आहे. धरणाच्या पाणी पातळीत २.२७ मी.ने वाढ झाली असून सरासरी पाणी आवक १२३३१क्यु.आहे. तरी मंजूर जलाशय परिचलन आराखड्या प्रमाणे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज १२ वा.धरणातून ५००० क्युसेक विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे.