साताऱ्याच्या खंडणीबहाद्दरांचा बंदोबस्त करणार
By admin | Published: January 30, 2015 10:21 PM2015-01-30T22:21:08+5:302015-01-30T23:18:28+5:30
विजय शिवतारे : बिल्डरांना दिलेल्या उत्खननाच्या नोटीसा परत घेणार
सातारा : ‘सातारा शहराच्या विकासामध्ये बिल्डर, उद्योजक व व्यापारी यांचे योगदान महत्त्वाचे आहे. नियमबद्ध काम करणाऱ्या बिल्डरांना उत्खननासाठी लाखो रुपयांचा दंड केल्याचा अजब प्रकार साताऱ्यातच मी पाहिला आहे. नियमात काम करणाऱ्या बिल्डरांना उत्खननासाठी बजावण्यात आलेली नोटीस जिल्हाधिकाऱ्यांना परत घेण्याची सूचना देण्यात येणार आहेत. तसेच बिल्डर, डेव्हलपर व उद्योजकांना त्रास देणाऱ्या खंडणीबहाद्दरांचा बंदोबस्त करणार आहे,’ असे आश्वासन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले. येथील के्रडाई सातारा शाखा व बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया सातारा शाखेच्यावतीने पालकमंत्री शिवतारे यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी शिवतारे बोलत होते.के्रडाई सातारा शाखा व बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया सातारा शाखेच्यावतीने क्रिडाई शाखेचे अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर, उपाध्यक्ष कमलेश पिसाळ यांनी शिवतारे यांचे स्वागत केले.
पालकमंत्री शिवतारे यांनी विविध विषयांवर सखोल चर्चा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘सातारा शहर व परिसरातील बिल्डर, डेव्हलपर, उद्योजक व व्यापारीवर्ग यांना खंडणीबहाद्दरांचा त्रास होत असून या खंडणी बहाद्दरांचा ताबडतोब बंदोबस्त करणार आहे. त्यासाठी येत्या काही दिवसात बिल्डर, डेव्हलपर, उद्योजक, व्यावसयिक यांची एकत्रित बैठक जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत आयोजित करणार आहे. यामध्ये खंडणीबहाद्दरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणार आहे.महाराष्ट्रातील अनेक छोट्या शहरांचा वेगाने विकास होत असून सातारा जिल्ह्याचा येत्या काही काळात आधुनिक सातारा असा चेहरा समोर आणण्यासाठी सातारा शहर व जिल्ह्यात विविध उद्योगधंदे आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विकासामध्ये सर्वात मोठा बिल्डर, डेव्हलपर यांचा वाटा आहे, असेही त्यांनी सांगितले.’
यावेळी आ. शंभूराज देसाई, श्रीधर कंग्राळकर, कमलेश पिसाळ, सुधीर शिंदे, सुधीर घार्गे, बाळासाहेब ठक्कर, अभिजित पाटील, सुधीर ठोके, मंगेश वाडेकर, जितेंद्र भोसले, सलीम कच्छी, राहुल वखारिया, पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘लोकमत’चे कौतुक...
‘लोकमत’ने साताऱ्याच्या बिल्डरांना येणाऱ्या अडचणीविषयी सातत्याने लेखन केले होते.‘लोकमत’च्या या भूमिकेचे यावेळी बिल्डरांनी शिवतारे यांच्यासमोर कौतुक केले. ‘सातारा शहराचा विकास करण्यासाठी शहराची हद्द वाढ होणे गरजेचे असून मुख्यमंत्र्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावणार आहे. त्याप्रमाणे सातारा शहरात डेव्हलपमेंट प्लॅन लागू करणे गरजेचे असून यासंबंधातील आर. पी. कमिटीची नव्याने स्थापना करून या समितीमध्ये बिल्डर, आर्किटेक्ट व व्यापारी यांचे प्रतिनिधी नेमणार आहे. यासाठी के्रडाई व बिल्डर्स असोसिएशनने शहराचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने करता येईल यासाठी आराखडा तयार करावा,’असे आवाहन शिवतारे यांनी केले.