साताऱ्यात मान्सून ६५ टक्केच बरसला, दुष्काळ गंभीर बनला

By नितीन काळेल | Published: November 20, 2023 06:55 PM2023-11-20T18:55:09+5:302023-11-20T18:55:27+5:30

परतीच्या पावसाचीही हुलकावणी; प्रशासनाचे नियोजन, दुष्काळी तालुके हवालदिल

Satara received only 65 percent of the monsoon, the drought became severe | साताऱ्यात मान्सून ६५ टक्केच बरसला, दुष्काळ गंभीर बनला

साताऱ्यात मान्सून ६५ टक्केच बरसला, दुष्काळ गंभीर बनला

सातारा : जिल्ह्याला मान्सूनने दगा दिल्याने पावसाळ्याच्या चार महिन्यात अवघा ६५ टक्के पाऊस बरसला. त्यामुळे यंदा तब्बल ३०६ मिलीमीटर पावसाची तूट आहे. त्यातच सर्वच तालुक्यातही कमी पर्जन्यमान झाले असून परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे दुष्काळी भागात पाझर तलाव, ओढे कोरडे आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे नियोजन सुरू असून जनता हवालदिल झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे जून महिन्यात मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांचे गणित सुरू होते. यंदा मात्र, हवामान विभागाने चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तविलेला. पण, सातारा जिल्ह्यासाठी तरी हा अंदाज खोटा ठरलेला आहे. कारण, जूनपासून सप्टेंबरपर्यंतच्या पावसाळ्याच्या चार महिन्यात पावसाने सतत दगा दिला. मोठा पाऊस नसल्याने पावसाळ्याच्या चार महिन्यात जिल्ह्यात फक्त ६५.०४ टक्केच पर्जन्यमानाची नोंद झाली.

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ८८६.०२ मिलीमीटर पाऊस होणे अपेक्षित असते. यंदा ३० सप्टेंबरअखेर फक्त ५७९.६ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली होती. याचाच अऱ्थ यावर्षी तब्बल ३०६ मिलीमीटर पावसाची तूट आहे. त्याचबरोबर सर्वच तालुक्यात कमी पावसाची नोंद झाली. यंदा कोणत्याही तालुक्यात १०० टक्के पाऊस झालेला नाही. यामध्ये सर्वात कमी पाऊस कोरेगाव तालुक्यात ४८ टक्केच झाला. तर सर्वाधिक पाऊस सातारा तालुक्यात ७६ टक्क्यांपर्यंत पडला आहे. त्यामुळे इतर तालुक्यातील पावसाची स्थिती समजून येते.

दुष्काळी तालुके हवालदिल..

दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव आणि खंडाळा तालुक्यात पावसाने डोळे वटारलेले दिसून आले. यामुळे या तालुक्यात चिंताजनक स्थिती आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत कोरेगाव तालुक्यात ४८.०१ टक्के पाऊस झाला. तर माणमध्ये ६१.५, खटाव ६८.६, फलटण ४९.१, खंडाळा तालुक्यात ५२.५ टक्के पाऊस पडला आहे. यामुळे चारा टंचाई जाणवणार आहे. त्याचबरोबर माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर होणार आहे.

Web Title: Satara received only 65 percent of the monsoon, the drought became severe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.