सातारा : एका दिवसात ४० लाखांची वसुली, लोकअदालतीचा फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 01:52 PM2018-09-11T13:52:01+5:302018-09-11T14:02:13+5:30
सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी आयोजित केलेल्या लोकअदालतीचा चांगलाच परिणाम झाला आहे. ८ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या या मोहिमेत तब्बल ४० लाख १३ हजार ९०३ रुपयांची वसुली झाली.
सागर गुजर
सातारा : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी आयोजित केलेल्या लोकअदालतीचा चांगलाच परिणाम झाला आहे. ८ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या या मोहिमेत तब्बल ४० लाख १३ हजार ९०३ रुपयांची वसुली झाली.
घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी भरण्याबाबत जिल्ह्यातील ६२५ ग्रामपंचायतींच्या ५३ हजार ९८८ खातेदारांना नोटीस बजावली होती. नोटीस बजावल्यानंतर ९ हजार ६३७ खातेदारांनी स्वत:हून पुढाकार घेत थकीत बिले भरली. नोटीस काळात २५ कोटी ९० लाखांची वसुली झाली.
जिल्ह्यातील ५८८ ग्रामपंचायतीच्या थकीत कर वसुलीसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने लोकअदालतीचे आयोजन केले होते. या लोकअदालतीबाबत जिल्ह्यातील ५३ हजार ९८८ खातेदारांना नोटीस बजावण्यात आली होती. ८ सप्टेंबर रोजी झालेल्या लोकअदालतीत ३२६ ग्रामपंचायतींच्या १ हजार ७२७ खातेदारांनी सहभाग घेतला. या लोकअदालतीमध्ये सातारा तालुक्यातील ६२ ग्रामपंयतीच्या ४२१ खातेदारांकडून १० लाख ३० हजार २७७ रुपयांची वसुली झाली.
कोरेगाव तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या ३९० खातेदारांकडून ७ लाख २३ हजार ९१० रुपये, खटावातील १६ ग्रामपंचायतीच्या ८३ खातेदारांकडून २ लाख ९१ हजार ५८४ रुपये, माणमधील १२ ग्रामपंचायतीच्या ६२ खातेदारांकडून ४७ हजार ५३४ रुपये, फलटणमधील ४९ ग्रामपंचायतीच्या १५९ खातेदारांकडून ३ लाख ११ हजार ७०० रुपये, खंडाळ्यातील १८ ग्रामपंचायतीच्या ५८ खातेदारांकडून १ लाख ७४ हजार ४२९ रुपये, वाईमधील ४६ ग्रामपंचायतीच्या ८२ खातेदारांकडून ३ लाख ४१ हजार ९५० रुपये, जावळीतील १४ ग्रामपंचायतींच्या ४२ खातेदारांकडून ७६ हजार ९६५ रुपये, महाबळेश्वरमधील ७ ग्रामपंचायतींच्या २६ खातेदारांकडून ५४ हजार ८६६ रुपये, कऱ्हाडातील ६५ ग्रामपंचायतींमधील २२० खातेदारांकडून ५ लाख ७६ हजार ९५७ रुपये, पाटण तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या १८४ खातेदारांकडून ३ लाख ८३ हजार ७३३ रुपयांची वसुली झाली.
आठ दिवसांत तीन कोटींची वसुली
जिल्ह्यातील ५८८ ग्रामपंचायतीच्या ११ हजार ३६४ खातेदारांना वसुलीबाबत नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. नोटीस बजावल्यानंतर १ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर या कालावधीत २ कोटी ९० लाख १३ हजार ९९३ रुपयांची वसुली झाली.
सातारा महाराष्ट्रात दुसरा
सातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या लोकअदालतीच्या माध्यमातून जिल्ह्याचा महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक आला आहे. थकीत पाणीपट्टी व स्ट्रिटलाईट वीजबिलाच्या वसुलीमध्ये सातारा जिल्ह्याचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक आला आहे. पुणे जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला आहे. महाराष्ट्र स्टेट लिगल सर्व्हिसेस आॅथॅरिटी, मुंबई यांनी याची घोषणा केली आहे.
लोकअदालतीमध्ये थकीत कर वसुलीचे दावे निकाली निघत आहेत, ही अत्यंत जमेची बाजू आहे. यामध्ये संबंधित ग्रामपंचायती व त्यांचे खातेदार यांच्यात सामोपचाराने समेट घडवला जातो. थकीत कर वसुलीचा फायदा ग्रामपंचायत
हद्दीतील विकासकामांसाठीच होत असतो. लोकांनी थकबाकीच ठेवली नाही तर लोकअदालतीपर्यंत जाण्याचीही वेळ येणार नाही.
- डॉ. कैलास शिंदे,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
ग्रामपंचायतींच्या थकीत बिलाच्या वसुलीसाठी लोकांनी सहकार्य करणे आवश्यक
आहे. लोकअदालतीत जाण्याची वेळ येऊ नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली
पाहिजे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांसाठीच कर वसुली
वेळेत भरणे आवश्यक आहे.
- अविनाश फडतरे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत