सातारा : औंधच्या मोतीची आठवण आजही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 14:33 IST2018-06-13T14:33:05+5:302018-06-13T14:33:05+5:30
औंधवासीयांच्या कुटुंबातील सदस्य मोती ऊर्फ गजराजला १४ जून २०१७ रोजी निरोप दिला. त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले असले तरी त्याच्या आठवणी या ग्रामस्थांच्या मनात अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे.

सातारा : औंधच्या मोतीची आठवण आजही कायम
औंध : औंधवासीयांच्या कुटुंबातील सदस्य मोती ऊर्फ गजराजला १४ जून २०१७ रोजी निरोप दिला. त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले असले तरी त्याच्या आठवणी या ग्रामस्थांच्या मनात अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे.
औंधवासीयांच्या कुटुंबातील सदस्य बेचैन व सैरभैर झाला होता. आपल्या कुटुंबातील सदस्य वाटणारा मोती ऊर्फ गजराज जाणार होता, या काळजीने संपूर्ण औंधवासीय मोतीला निरोप देण्यासाठी सकाळी सहापासून ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत मोतीबरोबर खरशिंगे रोडच्या बाजूला असणाऱ्या माळात थांबले होते.
गेली अनेक दशके औंधवासीयांशी अतूट व जिव्हाळ्याचे भावनिक नाते असणारा औंध संस्थानचा गजराज ऊर्फ मोती हत्तीला नेण्यासाठी मथुरा येथील एलिफंट केअर सेंटरची सर्व यंत्रणा तसेच प्रशासन बुधवार, दि. १४ जून २०१७ रोजी सकाळी औंधमध्ये दाखल झाले होते. हजारो औंध ग्रामस्थांच्या उपस्थितीत जड अंत:करणांनी ग्रामस्थांनी आपल्या लाडक्या गजराजला भावपूर्ण निरोप दिला.
हत्तीला हलविण्याकरिता वन खाते, महसूल व पोलीस प्रशासन सकाळी सात वाजता औंधमध्ये हजर झाले. हत्तीला हलविणार असल्याचे कळताच ग्रामस्थ, आबालवृद्ध यांच्यासह महिलांनी मोठ्या प्रमाणावर राजवाडा परिसरात गर्दी केली. औंध ग्रामस्थांच्या भावनेचा विचार करत प्रशासनाने संपूर्ण गावातून, ग्रामस्थांच्या उपस्थितीत सकाळी हत्तीची फेरी काढली.
औंधसह परिसरातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत लाडक्या गजराजला भावपूर्ण निरोप देण्यासाठी नागरिक प्रचंड दु:खी होते. महिला वर्ग अक्षरश: धडाधडा रडत असल्याचे पाहून अधिकारीही भावनिक झाले होते.
मातीचे दर्शन सोशल मीडियावरून...
मथुरा येथील एलिफंट केअर सेंटर येथे मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, हर्षिताराजे, चारुशीलाराजे यांच्यासह औंध व औंधच्या बाहेर नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर असलेल्या येथील अनेक ग्रामस्थ प्रत्यक्ष जाऊन मोतीला भेटून आले. तेथून आल्यानंतर मोतीची खुशाली भेटणाºया प्रत्येकाला सांगत होते. तेथूनच सोशल मीडियावरही फोटो टाकून औंध ग्रामस्थांना त्याचे दर्शन घडविले.