सातारा : ९५ कोटी खर्चून कोयना जलविद्युत केंद्राची दुरुस्ती : चंद्रकांत बावनकुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 05:03 PM2018-10-26T17:03:48+5:302018-10-26T17:07:03+5:30
पोफळी येथील कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी सुमारे ९५ कोटी रुपयांची आवश्यकता असून या कामाचा प्रस्ताव त्वरित सादर करण्यात यावा, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महानिर्मितीच्या प्रशासनाला दिले.
सातारा : पोफळी येथील कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी सुमारे ९५ कोटी रुपयांची आवश्यकता असून या कामाचा प्रस्ताव त्वरित सादर करण्यात यावा, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महानिर्मितीच्या प्रशासनाला दिले.
ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी आज कोयना जलविद्युत वीजनिर्मिती प्रकल्पाला भेट दिली व पाहणी केली. तसेच टप्पा क्रमांक १ व २ भूगर्भ जलविद्युत केंद्र, ७0 मेगावॉट व ८0 मेगावॉटच्या प्रत्येकी ४ संचांची पाहणी केली. टप्पा क्रमांक ४ भूगर्भ जलविद्युत केंद्र्र, भूमिगत गॅस इन्सूलेटेड स्वीचयार्ड, कोयना धरण पायथा विद्युत गृह आदींची पाहणी केली. कोयना जलविद्युत केंद्राच्या संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी हि माहिती पत्रकारांना दिली.
या बैठकीत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, बेरोजगार प्रकल्पग्रस्तांना महानिर्मितीच्या सेवेत मार्किंग पद्धतीने आणणे, युनियनचे प्रश्न सोडविणे, बोगद्यामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे आरोग्यविषयक प्रश्न आदींसह वेळेवर येणाऱ्या विविध प्रश्नांवर ताबडतोब निर्णय घेण्यात आला. यासोबतच पोफाळी ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ७.५ किलोमीटर पाईपलाईनचे काम महानिर्मितीच्या सामाजिक दायित्व निधीतून करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
सुरक्षा रक्षकांचा अनेक दिवसांपासूनचा प्रलंबित प्रश्न सोडविताना ३६ सुरक्षा रक्षकांना १५ नोव्हेंबरपर्यंत कामावर घेण्याचे निर्देश ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले. या दरम्यान ३१ मार्च २0१८ पर्यंतचे ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांच्या वीजबिलांची थकबाकी ही राज्य शासन भरणार आहे. त्यानंतर नवीन वीजमीटर लावून आलेले वीजबिल संबंधित ग्रामपंचायतींना भरावे लागणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या दौऱ्यात व आढावा बैठकीत महानिर्मिती व महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.