सातारा : सोनगाव ग्रामस्थांनी पुन्हा रोखल्या घंटागाड्या, कचरा डेपोतील धूर थांबता थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 01:40 PM2018-11-12T13:40:00+5:302018-11-12T13:41:56+5:30
गेल्या तीन दिवसांपासून धुमसत असलेल्या सोनगाव कचरा डेपोतील धुराचा प्रश्न सोमवारीही जैसे थे होता. आंदोलन करूनही डेपोतील धूर न थांबल्याने ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले.
शेंद्रे : गेल्या तीन दिवसांपासून धुमसत असलेल्या सोनगाव कचरा डेपोतील धुराचा प्रश्न सोमवारीही जैसे थे होता. आंदोलन करूनही डेपोतील धूर न थांबल्याने ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले.
डेपोच्या बाहेर सर्व घंटागाड्या अडवून ठेवून आधी धूर थांबवा मगच कचरा टाका अशी भूमीका ग्रामस्थांनी घेतली. दरम्यान, मुख्याधिकारी शंकर गोरे व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या.
सोनगाव येथील कचरा डेपोला शुक्रवारी सायंकाळी आग लागली आहे. शनिवारी व रविवारी दिवसभर ही आग सुरूच होती. आगीमुळे सुमारे दहा किलोमीटर क्षेत्रात धुराचे लोट हवेबरोबरच पसरत होते.
ऐन दिवाळीत डेपोतील कचरा पेटल्याने परिसरातील हजारो ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामना करावा लागला. पालिकेकडून कोणतीच उपाययोजना न केल्याने रविवारी सकाळी सोनगाव, जकातवाडी व डबेवाडी परिसरातील ग्रामस्थ सोनगाव डेपोजवळ एकत्र आले होते. या ठिकाणी त्यांनी घंटागाड्या अडवून धूर तातडीने थांबविण्याची मागणी केली होती.
या आंदोलनानंतर पालिकेच्या अग्निशामक विभागाकडून आग विझविण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, आग आटोक्यात आली नाही. सोमवारी सकाळी डेपोतून धुराचे लोट येऊ लागल्याने ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले. बोगद्यातून डेपोकडे येणाऱ्या सर्वच घंटागाड्या ग्रामस्थांनी रस्त्यावर अडवून ठेवल्या.
या आंदोलनाची माहिती मिळताच मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या अडणची समजून घेऊन यावर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्याधिकारी गोरे यांनी दिले.