सातारा : निवृत्त पोलीस निरीक्षकाला ५८ हजारांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 01:30 PM2018-08-02T13:30:59+5:302018-08-02T13:34:25+5:30
तुमच्या बँकेतून बोलतोय, तुमचे अकाऊंट अपडेट करायचे आहे, असे म्हणून निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या बँक खात्यातून ५८ हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना घडली.
सातारा : तुमच्या बँकेतून बोलतोय, तुमचे अकाऊंट अपडेट करायचे आहे, असे म्हणून निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या बँक खात्यातून ५८ हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना घडली.
याबाबत निवृत्त पोलीस निरीक्षक मोहन एकनाथ नलवडे (वय ७५, रा. कूपर कॉलनी, सदरबझार) यांना सोमवारी सांयकाळी एका अनोळखी मोबाईल नंबरवरून कॉल आला. मी तुमच्या बँकेतून बोलतोय, तुमचे अकाऊंट अपडेट करायचे आहे, त्यासाठी तुमचा अकाऊंट नंबर, एटीएम नंबर मागितला.
नलवडे यांनी त्यांना सर्व माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबरही त्या अनोळखी व्यक्तीला सांगितला.
त्यानंतर मंगळवारी त्यांच्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खात्यातून ५८ हजार रुपये काढले गेले. त्यानंतर नलवडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक डाळिंबकर करीत आहेत.