डोली, कार नाही, तर नवरी आली चक्क रिक्षातून लग्नमंडपात; रिक्षाचालक बापाच्या कष्टाला अनोखा सलाम
By दीपक शिंदे | Published: November 29, 2023 07:06 PM2023-11-29T19:06:30+5:302023-11-29T19:07:19+5:30
साताऱ्यातील रिक्षाचालकाच्या लेकीचं लग्न सर्वत्र चर्चेचाच विषय
सातारा : लेकीचं लग्न जोशात करायचं असा प्रत्येक बापाचा हेका असतो. कर्ज काढावं लागलं तरी चालेल पण चारचौघात लग्न एकदम झोकात झालं पाहिजे अशी अपेक्षा असते. असंच झोकात लग्न करण्याचा निर्णय घेतलेल्या बापाला मुलीचा हट्टही पुरवावा लागला. लग्नाला जाणार तर रिक्षातूनच असा हट्ट तिने केला आणि वडिलांनी एक ना दोन तब्बल २० रिक्षा दारात आणून उभ्या केल्या. सर्व वऱ्हाडी मंडळी रिक्षातूनच लग्नमंडपात दाखल झाली. त्यामुळे हे लग्न सर्वत्र चर्चेचाच विषय ठरले.
सातारा शहराजवळील गोडोलीमधील राजेवाडी येथील विजय खामकर हे रिक्षा चालवतात. रिक्षा चालवून त्यांनी आपला संसार केला. त्यांची लेक सायली खामकर हिचा विवाह सांगवड (ता. पाटण) येथील शुभम पाटील यांच्याशी सोमवारी ( दि. २७ ) रोजी झाला. तिच्या लग्नासाठी आलेली वऱ्हाडी मंडळी ही रिक्षातूनच आली आणि हा लग्नसोहळा लक्षवेधक ठरला.
रिक्षा चालवून कुटुंब चालवणाऱ्या वडिलांच्या कष्टाला अनोख्या पद्धतीनं सायली खामकर हिनं सलाम केला आहे. सायलीनं तिच्या लग्नाचं वऱ्हाडही रिक्षातून नेण्यासाठी हट्ट धरला. वडिलांनी देखील लेकीचा हट्ट पूर्ण करण्याचा संकल्प केला आणि तो पार पाडला. यासाठी त्यांना देगाव येथील पाटेश्वर रिक्षा संघटनेची मदत झाली. या संघटनेतील रिक्षाचालकांनी आपापल्या रिक्षा लग्नानिमित्त सजवून वऱ्हाडी मंडळींच्या प्रवासासाठी सज्ज ठेवल्या. राजेवाडी ते सातारा येथील मंगल कार्यालयापर्यंत वऱ्हाडी मंडळी रिक्षातून दाखल झाली.
राजेवाडीतील बहूतेक जण रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात. विजय खामकर हे व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. त्यांची कन्या सायली हिनं रिक्षा व्यवसायातून कुटुंबाला स्थैर्य, सुबत्ता लाभली. या भावनेतूनच लग्नाला येणारी वऱ्हाडी मंडळी रिक्षातून न्यायचा आग्रह धरला. यातून तिने आपल्या वडिलांच्या कष्टाला अनोख्या पद्धतीने सलाम केला. सायली खामकर हिच्या लग्नासाठी १५ ते २० रिक्षांतून ही वऱ्हाडी मंडळी साताऱ्यातील मंगल कार्यालयात दाखल होताना पाहायला मिळाली.
सायली खामकरचा धाडसी निर्णय
सायली खामकर ही पदवीधर आहे. लग्नासाठी आपण दुसऱ्या कोणत्याही गाडीने न जाता स्वतःचा वडिलांच्या रिक्षामधून जावं हा क्षण सर्वांसाठी आनंदाचा आणि गर्वाचा होता. आपल्या वडिलांनी आयुष्यभर केलेल्या कष्टामुळे आपण इथवर पोहचलो याची जाणीव ठेवत तिने हा निर्णय घेतला. तिच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.