साताऱ्यात भुयारी गटारावरील रस्त्यालाच भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:40 AM2021-05-18T04:40:48+5:302021-05-18T04:40:48+5:30
सातारा : येथील कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या आवारात पालिकेकडून भुयारी गटार योजनेचे काम करण्यात आले आहे. या भुयारी गटारावरील रस्त्यालाच ...
सातारा : येथील कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या आवारात पालिकेकडून भुयारी गटार योजनेचे काम करण्यात आले आहे. या भुयारी गटारावरील रस्त्यालाच भगदाड पडल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. या ठिकाणाहून ये-जा करताना अनेक दुचाकीस्वार जायबंदी होत आहेत.
सातारा पालिकेकडून शहरात भुयारी गटार योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. काही पेठांमध्ये हे काम पूर्ण झाले असले तरी योजना मार्गी लागण्यासाठी आणखीन बरीच प्रतीक्षा सातारकरांना करावी लागणार आहे. या योजनेला पहिल्या टप्प्यात ५० कोटींचा निधी मंजूर झाला. परंतु, योजनेचे काम म्हणावे त्या गतीने झालेले नाही. आजवर केवळ २० ते २५ टक्केच काम पूर्णत्वास आले आहे. आधीच संथ गतीने चाललेल्या या कामालाही ‘कोरोना’चा फटका बसल्याने कामाची गती मंदावली आहे.
समर्थ मंदिर चौक ते राजवाडा या मार्गावरील कला, वाणिज्य महाविद्यालयाजवळ भुयारी गटार योजनेचे काम मार्गी लावण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराकडून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, रस्त्यालाच मोठे भगदाड पडल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. आधीच या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यात पुन्हा भर पडल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप नगरसेवक व नागरिकांकडून सातत्याने केला जात आहे. आता तर डांबरीकरण केलेल्या रस्त्यालाच भगदाड पडल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पालिका प्रशासनाने या प्रकाराची चौकशी करून तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
(कोट)
भुयारी गटार योजनेचे काम दर्जेदार झालेले नाही. काम झाल्यानंतर उत्तम पद्धतीने रस्ता डांबरीकरण करणे गरजेचे होते; परंतु तसे झाले नाही. पावसाळ्याच्या अगोदर जर रस्ता खचत असेल तर पावसाळ्यात काय परिस्थिती होईल, याचा अंदाज बांधता येत नाही. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी.
- धनंजय जांभळे, नगरसेवक
फोटो मेल :
साताऱ्यातील कला, वाणिज्य महाविद्यालयाजवळ भुयारी गटर योजनेवरील रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. (छाया : जावेद खान)