Satara: श्वानाला वाचवायला धावला; बिबट्याने शेतकऱ्यावरच हल्ला चढवला
By संजय पाटील | Published: October 26, 2023 02:22 PM2023-10-26T14:22:57+5:302023-10-26T14:23:15+5:30
कऱ्हाड : साजूर, ता. कऱ्हाड येथे लोकवस्तीत घुसून बिबट्याने जर्मन शेफर्ड श्वानावर हल्ला केला. त्यावेळी श्वानाला वाचविण्यासाठी धावलेल्या शेतकºयावरही ...
कऱ्हाड : साजूर, ता. कऱ्हाड येथे लोकवस्तीत घुसून बिबट्याने जर्मन शेफर्ड श्वानावर हल्ला केला. त्यावेळी श्वानाला वाचविण्यासाठी धावलेल्या शेतकºयावरही बिबट्याने झेप घेतली. मात्र, ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने तेथून शिवारात धूम ठोकली.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, साजूर येथे कोयना नदीकाठी पाळसकर वस्ती असून तेथे दिपक पाळसकर यांच्या जर्मन शेफर्ड श्वानावर बिबट्याने हल्ला केला. हा प्रकार निदर्शनास येताच दिपक पाळसकर श्वानाला वाचवायला गेले. त्यावेळी बिबट्याने श्वानाला सोडून पाळसकर यांच्यावरच झेप टाकली. अचानक झालेल्या या हल्ल्याने पाळसकर घाबरले. मात्र, त्यावेळी शेजारीच असलेल्या भागवत कुंभार यांनी जोरजोरात आरडाओरडा केला. त्यामुळे पाळसकर यांना सोडून बिबट्याने पुन्हा श्वानावर हल्ला चढवला. त्याला ठार करुन बिबट्या ऊसात पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच उपसरपंच संदीप पाटील, सुधीर कचरे, मुकुंद कचरे, सागर चव्हाण, सुरेश कचरे यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती वन विभागालाही देण्यात आली आहे. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले.