शाहूनगरीत भरणार ‘सातारा साहित्य संमेलन’
By admin | Published: February 2, 2015 09:32 PM2015-02-02T21:32:37+5:302015-02-02T23:57:37+5:30
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची माहिती : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने घेतला पुढाकार
सातारा : ‘सातारा साहित्य क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने या वर्षीपासून ‘सातारा साहित्य संमेलन’ सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेतर्फे घेतला आहे. यंदाचे संमेलन बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त समर्पित करण्यात आले आहे. हे संमेलन मंगळवार, दि. १७ रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहा या यावेळेत शाहू कला मंदिर येथे होणार आहे,’ अशी माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.शिवेंद्रसिंहराजे भोसले पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘गेल्यावर्षी विभागीय साहित्य संमेलन व दुसरे युवा साहित्य नाट्य संमेलन यशस्वी करून शाहूपुरी शाखेचा ठसा राज्यभर उमटविलेला आहे.मंगळवारी होणार असलेल्या साहित्य संमेलनात सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांचा गौरव करून त्यांना सातारकरांतर्फे कृतज्ञता निधी प्रदान करण्यात येणार आहे. संमेलनाच्या पहिल्या सत्रात उद्घाटन, दुसऱ्या सत्रात बाबा आमटे यांच्या जीवनावर परिसंवाद, तिसऱ्या सत्रात कथाकथन तर चौथ्या सत्रात आमटे दाम्पत्याला कृतज्ञता निधी प्रदान केला जाणार आहे. त्यानंतर आमटे दाम्पत्याची मुलाखत घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)
संमेलनाध्यक्षपदी अवचट; संतोष यादव स्वागताध्यक्ष
संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याची विनंती डॉ. अनिल अवचट यांना केली होती. ती त्यांनी स्वीकारली आहे. तर स्वागताध्यक्षपद सातारा येथील उद्योजक संतोष यादव भूषवणार आहेत, अशीही माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.