सातारा : चक्क मंडप लावून कलिंगडची विक्री, उन्हाळ्यात गारवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 06:52 PM2018-04-27T18:52:54+5:302018-04-27T18:52:54+5:30
उन्हाचा पारा भलताच वाढला असून, अंगाची लाहीलाही होत आहे. उन्हाच्या झळांपासून बचाव म्हणून प्रवासी थंडगार पेय व कलिंगडाच्या फोडींना पसंती देत आहेत. पालखी मार्गावर पंधरा रसवंतीगृह व बारा मोठे कलिंगडाचे स्टॉल तसेच लिंबू सरबताचे स्टॉल दुचाकीस्वारांना थंडावा देत आहेत. विशेष म्हणजे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चक्क मंडप टाकले आहेत.
तरडगाव : उन्हाचा पारा भलताच वाढला असून, अंगाची लाहीलाही होत आहे. उन्हाच्या झळांपासून बचाव म्हणून प्रवासी थंडगार पेय व कलिंगडाच्या फोडींना पसंती देत आहेत. पालखी मार्गावर पंधरा रसवंतीगृह व बारा मोठे कलिंगडाचे स्टॉल तसेच लिंबू सरबताचे स्टॉल दुचाकीस्वारांना थंडावा देत आहेत. विशेष म्हणजे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चक्क मंडप टाकले आहेत.
जसजसा एप्रिल महिना संपत आहे, तसे सूर्यनारायण आग ओकत आहेत. यामुळे शेतकरी तर शेतातील कामे दिवस उजाडण्यापूर्वी व संध्याकाळी मावळत्या वेळी करत आहेत. यंदा कडक उन्हाचे चटके भलतेच बसत आहेत.
या मार्गात रस्त्याकडेला झाडेच नसल्याने दुपारच्या सुमारास प्रवास करणाऱ्यास या शीतगृहांचा आसरा घ्यावाच लागत आहे. दुपारच्या सुमारास दुचाकीवरून प्रवास करणाºया प्रवाशांची उन्हामुळे दमछाक होत आहे. रस्त्यावरून जाताना एखादे रसवंतीगृह अथवा कलिंगडाचे स्टॉल दिसल्यास त्याकडे गाडीचे स्टिअरिंग आपोआप वळत आहे.
रस्त्याकडेला ठिकठिकाणी मोक्याच्या जागेत मोठा मंडप उभारून त्यामध्ये विविध प्रकारचे गारवायुक्त स्टॉल दिसत आहेत. तसेच एरव्ही वडापाव विकणारे हातगाडे आता उन्हाळ्यात लिंबू सरबत विकत आहेत. शेतकरीही कलिंगडाच्या फोडी करून पैसा कमवत आहेत. प्रवासी कोरड पडलेल्या घशाला व संपूर्ण शरीराला गारवा म्हणून त्यावर ताव मारीत आहे. या मार्गातील विविध गावच्या बसस्थानक परिसरात आईस्क्रिमचे हातगाडे उभे दिसत आहेत. तसेच परिसरातील दुकानांमधून पाण्याच्या बाटल्या टांगलेल्या अवस्थेत पाहावयास मिळत आहेत.
रसवंतीगृहात देखील भलतीच गर्दी पाहावयास मिळत आहे. चौपदरीकरणाच्या कामात मोठी झाडे नष्ट झाल्याने लोणंद-फलटण रस्त्याच्या कडेला झाडांची गार झुळूकही लागत नाही. यामुळे प्रवास करताना क्षणभर विश्रांती असे म्हणत दुचाकीस्वार आपल्या बालचमूसह रस्त्याकडील अशा स्टॉलमध्ये थांबून उसाच्या रसाचा आस्वाद घेत आहेत.