साताऱ्यात पेढी कुठलीही २२ कॅरेटचा दर मात्र एकच, सराफ असोसिएशनचा निर्णय
By प्रगती पाटील | Published: April 8, 2024 05:23 PM2024-04-08T17:23:56+5:302024-04-08T17:24:11+5:30
ग्राहकांच्या पैशांची होणार बचत
सातारा : भारतातील इतिहासात पहिल्यांदाच साताऱ्यात, सातारा सराफ असोसिएशनने २२ कॅरेट दागिन्यांचे दर सर्व दुकानांमध्ये एकसारखे ठेवण्याचा निर्णय एक मताने घेतला आहे. हा निर्णय सोने खरेदी करणाऱ्या असंख्य ग्राहकांच्या हितासाठी घेतला आहे आणि तो नक्कीच सातारकरांना लाभदायक ठरेल, असा विश्वास असोसिएशनने व्यक्त केला आहे.
सातारा सराफ असोसिएशनच्या नुतन कार्यकारिणीची नुकतीची निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी प्रफुल नागोरी, उपाध्यक्षपदी नितिन घोडके, चेतन जैन, धोंडीराम पाटील, सचिवपदी पंकज नागोरी, सह-सचिव राहुल करमाळकर, खजिनदार जितेंद्र राठोड, आणि कार्यकारनि समिती सदस्य, चंद्रशेखर घोडके, संजय जैन, प्रविण देवी, किशोर देवी, नामदेव गिड्डे, कल्पेश जैन, मुकेश जैन, रमेश घाडगे, अतुल घोडके आणि चंदन महामुने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुतन कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
भारत व्यावसायिक दृष्ट्या कॉपोरेटे संस्कृतीच्या रूपात रूपांतरित होत आहे, सर्व सामान्य आणि मध्यम व्यावसायिक /उद्योजकांना व्यावसायिक दृष्टीने संघर्ष करावा लागत असतो, तसेच ग्राहकांच्या मागण्यांना लक्षात घेता नूतन निवडलेल्या अध्यक्ष आणि त्यांच्या टीमने ग्राहकांच्या फायद्यासाठी अणि हितासाठी हा सरळ आणि सोपा उपाय काढला आहे. सोन्याच्या दरात एक सारखेपणा असावा असा निर्णय घेतल्याने सातारा सराफा बाजारातील येणाऱ्या ग्राहकांना योग्य दरात सर्वोत्तम कलाकुसरीचे असणारे दागिने या निमित्ताने मिळणार आहेत.
ग्राहकांच्या पैशांची होणार बचत
साताऱ्यात सराफी पेढीमध्ये सोने खरेदी करायला गेले की प्रत्येकाचे सोन्याचे दर वेगवेगळे होते. कोणी मजुरीचा दर वेगळा सांगायचे तर कोणी घडणावळीबाबत वेगळे नियम सांगायचे. एकुणच या सर्व प्रकारांमुळे ग्राहक हैराण व्हायचे. कोणावर भरवसा ठेवायचा आणि कुठून योग्य दरात सोने खरेदी करायचे याविषयी असणारा संभ्रम असोसिएशनच्या या निर्णयामुळे संपुष्टात आला आहे. असोसिएशनच्या या निर्णयामुळे ग्राहकांच्या पैशांची बचत होणार असून यामुळे स्थानिक सराफी पेठेला उर्जितावस्था येणार आहे.
वर्षानुवर्ष सोन्याचे दर सरासरी १० ते १५ टक्के वार्षिक वाढतात. त्याचा थेट फायदा सोन्यात गुंतवणूक करणार्यांना होतो. गुंतवणुकीचा स्वर्ग म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. म्हणून येणाऱ्या हिंदू नवं वर्षाला म्हणजे पाडव्याला सोने खरेदी करून आपले भविष्य उज्वल आणि आर्थिक दृष्ट्या मजबूत करा. - प्रफुल्ल नागोरी, अध्यक्ष सातारा सराफ अससोसिएशन