Satara: सातारा जिल्हा परिषदेचे पुरवणी अंदाजपत्रक ४४ कोटींचे
By नितीन काळेल | Published: July 19, 2023 11:51 AM2023-07-19T11:51:38+5:302023-07-19T11:51:50+5:30
Satara: सातारा जिल्हा परिषदेचे स्व उत्पन्नाचे २०२३-२४ वर्षाचे पुरवणी अंदाजपत्रक ४४ कोटींचे सादर करण्यात आले आहे. यामध्ये माॅडेल स्कूलसाठी तरतूद केली असून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रासाठीही ४ कोटींची रक्कम उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
- नितीन काळेल
सातारा - सातारा जिल्हा परिषदेचे स्व उत्पन्नाचे २०२३-२४ वर्षाचे पुरवणी अंदाजपत्रक ४४ कोटींचे सादर करण्यात आले आहे. यामध्ये माॅडेल स्कूलसाठी तरतूद केली असून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रासाठीही ४ कोटींची रक्कम उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सातारा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली ठराव समितीची बैठक झाली. यामध्ये पुरवणी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्यासह अऱ्थ तसेच इतर सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे स्व उत्पन्नाचे २०२३-२४ वर्षाचे मुळ अंदाजपत्रक हे ४९ कोटी ९९ लाख रुपयांचे होते. मार्च महिन्यात हे अंदाजपत्रक सादर करण्यात आलेले. त्यानंतर मंगळवारी ठराव समिती सभेत पुरवणी अंदात्रपत्रक सादर करण्यात आले. या अंदाजपत्रकात ४५ कोटी महसुली उत्पन्न गृहित धरण्यात आले. तर एकूण ९४ कोटींपैकी ९३ कोटी ९९ लाखांच्या एकूण महसुली खर्चाचे हे अंदाजपत्रक सर्व विभागाचा समतोल राखून तसेच एक लाख शिलकेचे सादर करण्यात आले.
या पुरवणी अंदाजपत्रकात शिक्षण विभागासाठी ४ कोटी १३ लाख २ हजारांची तरतूद करण्यात आली आहे. बांधकामसाठी १५ कोटी ९१ लाख ९२ हजार, लघु पाटबंधारे २ कोटी २२ लाख ४४ हजार, आरोग्य विभाग ४ कोटी १ लाख, कृषी विभागासाठी २९ लाख १४ हजार, पशुसंवर्धन २३ लाख १३ हजार, समाजकल्याण ५ कोटी ८७ लाख ३९ हजार, महिला व बालकल्याण विभाग ७ लाख १६ हजार अशी विभागनिहाय तरतूद करण्यात आलेली आहे.
मूळ अन् पुरवणी अंदाजपत्रकानुसार विभागनिहाय एकूण तरतूद...
सामान्य प्रशासन २ कोटी ५१ लाख
शिक्षण ११ कोटी ३८ लाख २ हजार
बांधकाम २८ कोटी ९६ लाख ९२ हजार
लघु पाटबंधारे ३ कोटी ४७ लाख ४४ हजार
आरोग्य ५ कोटी ३६ लाख
कृषी २ कोटी ८९ लाख १४ हजार
पशुसंवर्धन १ कोटी ४३ लाख १३ हजार
समाजकल्याण ९ कोटी १२ लाख ४७ हजार
सामुहिक विकास २ लाख
संकीर्ण (सामान्य) २५ कोटी २१ लाख ९७ हजार
महिला व बालकल्याण १ कोटी ९७ लाख १६ हजार
एकात्मिक बालविकास प्रकल्प १३ लाख ७५ हजार
ग्रामीण पाणीपुरवठा १ कोटी ५० लाख