सातारा : भक्तिभाव अन् जल्लोषात बाप्पांना निरोप

By admin | Published: September 9, 2014 10:50 PM2014-09-09T22:50:54+5:302014-09-09T23:45:06+5:30

दिमाखदार मिरवणूक : ‘पुढच्या वर्षी लवकर या’ ची भक्तांकडून साद!

Satara: Say goodbye to friends in devotion and sorrows | सातारा : भक्तिभाव अन् जल्लोषात बाप्पांना निरोप

सातारा : भक्तिभाव अन् जल्लोषात बाप्पांना निरोप

Next

सातारा : ढोल ताशांचा कडकडाट आणि डॉल्बीच्या दणदणाटात पारंपरिक पध्दतीने बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. पुढच्या वर्षी लवकर या अशी साद देत साश्रु नयनांनी भक्तांनी बाप्पांना निरोप दिला.
सातारा शहरात सकाळपासूनच बाप्पांची विसर्जन मिरवणुक सुरू झाली होती. सातारकरांनी घरचे गणपती विसर्जन करून या मिरवणुकीत सहभाग नोंदविला. ढोल ताशा, पारंपारिक वाद्य, लेझिम यांच्यासह यंदाच्या मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाटही होता. रिमांड होम व शिवाजी उदय मंडळाने यंदाही पारंपारिक पध्दतीने मिरवणुक काढून सर्वांचे लक्ष वेधले. सावकरांच्या गणपती मिरवणुकीपुढे मुलींचा दांडपट्टाचा खेळ सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले.
यावर्षी काही मंडळांच्या मुर्ती मोठ्या होत्या. या मुर्तींंचे मुकूट विद्युत वाहिन्यांना थडकले. यामुळे शॉर्टसर्किटचा धोका लक्षात घेता. मिरवणुक मार्गावरील सर्व पथदिवे बंद करण्यात आले होते. त्यामुळे या मार्गावरून ये जा करताना भक्तांना त्रास होत होता.
गणपती विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी राजपथ आणि खालचा रस्ता गर्दीने ओसंडून गेला होता. ग्रामीण भागातूनही मोठी वाहने करून ग्रामस्थ श्रींच्या दर्शनासाठी आले होते.
अनेकांनी मोती तळे आणि मंगळवार तळे परिसरात विसर्जन पाहण्यासाठी गर्दी केली होती. यात प्रामुख्याने महिला आणि मुलांचा समावेश होता. आधुन मधून येणाऱ्या पावसांच्या सरीने सर्वांनाच चिंब केले. पावसात भिजतच अनेकांनी बाप्पांना निरोप दिला. मिरवणुकीत झिंगणाऱ्या अनेकांनी गर्दीचे करमणुक केले. गाण्याच्या ठेक्यावर ताल धरून नाचणारे हे तळीराम बघणाऱ्यांचे मनोरंजन करत होते. तर याच गर्दीत नव्याने ‘ढकलू’ झालेल्या युवा कार्यकर्त्यांचा ‘हँग ओव्हर’ उतरवण्यात काही कार्यकर्ते व्यस्त होते.
काहींनी अंधाराचा कोपरा गाठून धुम्रपान केले. (प्रतिनिधी)

महिलाराज...! गणपती विसर्जन मिरवणुक म्हटलं की डोळ्यासमोर चित्र येते ते बेधुंद होवून नाचणाऱ्या तरूणांचा. वाट्टेल तसे अंग हलवणाऱ्या या तरूणांचा नाच बघण्यासाठी मिरवणुक मार्गावर मोठी गर्दी असते. डॉल्बीच्या तालावर नाचणाऱ्या या तरूणांचा उत्साह सर्वांनाच थक्क करून टाकणारा असतो. विसर्जन मिरवणुकीत महिलाराज यंदाही पहायला मिळाला. केसरकर पेठचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत महिलांनी नाचण्याचा मनमुराद आनंद घेतला. डॉल्बीच्या तालावर थिरकणाऱ्या या महिला स्वच्छंदीपणे नाचत होत्या. कोणी आपल्याकडे बघतयं याची तमा न बाळगता बेफाम नृत्य करणाऱ्या या महिला पाहून उपस्थितांनीही त्यांना भरभरून दाद दिली.

गणपती विसर्जन मिरवणुक सुरळित पार पडावी यासाठी शहराच्या मुख्य ठिकाणी आणि प्रमुख चौकांत पोलिसांच्यावतीने मचान उभारण्यात आले होते. दोन गणपती समोरासमोर आल्यानंतर बऱ्याचदा तणाव निर्माण होतो. अशा वेळी दंगा करणाऱ्यांवर चाप बसावा आणि मिरवणुक सुरळीतपणे पार पडावी या हेतूने पोलिसही सजग असतात. मिरवणुक मचानापासून पुढे गेले की ती मार्गस्त होईपर्यंत पोलिस दादाला दुर्बिणीच्या सहाय्याने या मिरवणुकीवर लक्ष ठेवावे लागते. यामुळे बराच वचक बसतो.

४शास्त्रीय दृष्ट्या गणपती विसर्जन करण्याला अलिकडे मर्यादा येवू लागल्या आहेत. उंचावरून बाप्पांची मूर्ती पाण्यात टाकण्यात येते. यंदा मात्र, गोडोली येथील कृत्रिम तळ्यात बाप्पांचे विसर्जनाचे पावित्र्य राखले जावे यासाठी नियोजन करण्यात आले होते. टायर ट्युबच्या आधाराने पोहत जावून येथील एका नागरिकाने बाप्पांना तीन वेळेला पाण्यात डूबवून मग त्यांचे विसर्जन केले. यामुळे विसर्जनाचे पावित्र्य राखले गेल्याचे समाधान भक्तांमध्ये होते.

Web Title: Satara: Say goodbye to friends in devotion and sorrows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.