सातारा : एस वळणावर अपघाताची मालिका सुरूच, ट्रक उलटून चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 02:30 PM2018-05-08T14:30:20+5:302018-05-08T14:30:20+5:30
खंबाटकी घाटातील एस वळणावर झालेल्या अपघातात गेल्या महिन्यात १८ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या एस वळणावर अपघाताची मालिका अद्यापही सुरूच असून, मंगळवारी दुपारी सिमेंट वाहतूक करणारा ट्रक याच वळणावर उलटला. यामध्ये चालक जागीच ठार झाला.
खंडाळा : खंबाटकी घाटातील एस वळणावर झालेल्या अपघातात गेल्या महिन्यात १८ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या एस वळणावर अपघाताची मालिका अद्यापही सुरूच असून, मंगळवारी दुपारी सिमेंट वाहतूक करणारा ट्रक याच वळणावर उलटला. यामध्ये चालक जागीच ठार झाला.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटात भरधाव वेगात ट्रक एस वळणावर उलटला. या अपघातात चालक जागीच ठार झाला असून चौघे जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.
मृत चालकाला ट्रकच्या केबीनमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न पोलिसांचे सुरू होते. खंडाळा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना खंडाळ्यातील ग्रामीण रुग्णालयात पाठविले.
दरम्यान, गेल्या महिन्यात खंबाटकी बोगद्यातील या एस वळणावर टेम्पो उलटून कर्नाटकातील १८ प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. या अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने केवळ महामार्गावर पट्टे ओढून एस वळणाची डागडूजी केली होती. मात्र, त्यानंतरही या ठिकाणी दोन अपघात झाले. मंगळवारी दुपारी या ठिकाणी झालेला तिसरा अपघात असून, जिल्हा प्रशासनाला आता तरी जाग येईल का? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.