सातारा : शेंडा हिरवागार... बुंध्यांना आग, कास मार्ग भकासच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:57 PM2018-02-23T12:57:48+5:302018-02-23T13:05:19+5:30
घनदाट जंगल, दुसऱ्या बाजूला दरी यामुळे सातारा-कास मार्गाने सिनेसृष्टीलाही भुरळ घातली आहे. या मार्गावरील निसर्गाच्या सौंदर्याला विघ्नसंतोषींची दृष्ट लागली आहे. हिरव्यागार झाडांच्या बुंधक्याला अज्ञात लोक जाळ लावत असल्याने ते मरणयातना सहन करत आहेत. त्यामुळे ते कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. त्यामुळे कास मार्ग भकास होण्यास वेळ लागणार नाही.
पेट्री (सातारा) : घनदाट जंगल, दुसऱ्या बाजूला दरी यामुळे सातारा-कास मार्गाने सिनेसृष्टीलाही भुरळ घातली आहे. या मार्गावरील निसर्गाच्या सौंदर्याला विघ्नसंतोषींची दृष्ट लागली आहे. हिरव्यागार झाडांच्या बुंधक्याला अज्ञात लोक जाळ लावत असल्याने ते मरणयातना सहन करत आहेत. त्यामुळे ते कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. त्यामुळे कास मार्ग भकास होण्यास वेळ लागणार नाही.
सातारा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून कास, बामणोलीची ओळख आहे. देश_विदेशातून बहुसंख्य पर्यटक पर्यटनस्थळी वर्षभर भेटी देतात. धकाधकीच्या जीवनात मनाला प्रसन्नता, शुद्ध हवा, निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटता यावा, यासाठी बहुसंख्य पर्यटक परिसरात येतात.
येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला मायेच्या सावलीचा सुखावह स्पर्श देण्यात मोलाचा वाटा येथील घनदाट झाडीझुडपे, वृक्षांचाच आहे. येथील बहुसंख्य वनसंपदेनेच निसर्गाचे सौंदर्य वाढविलेले आहे. परंतु वणवा पेटविणाऱ्याकडून वनसंपदा दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. निसर्ग सौंदर्यही लोप पावले जाऊ लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
वणवा लावणाऱ्यांकडून येथील परिसर भकास करण्याचाच जणू काही ठेका घेतल्याचे दिसत आहे. हा वणवा आता वृक्षांच्याच मुळांवर उठू लागला आहे. रोपट्यांचे मोठ्या वृक्षात रूपांतर होण्यास कित्येक वर्षांचा कालावधी लागतो. ऊन, वारा, पावसापासून ही झाडे कित्येक वर्षे तग धरून पर्यावरणाचा संतुलन राखत असताना आता ही झाडे वणव्यात क्षणार्धातच जमीनदोस्त होऊ लागली आहेत.
सातारा-कास मार्गावर दोन-तीन महिन्यांपासून ठिकठिकाणी वणवे लावण्याचे प्रकार वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वी अंबानी ते पारंबे फाटा दरम्यान देवकल फाट्यानजीक पेटविलेल्या वणव्याने रस्त्यालगत तसेच आसपास काही झाडांच्या बुंध्यांनीच पेट घेतला. झाडांचे बुंधे आगीत धुपत असल्याने बुंध्यातून धुराचे लोट बाहेर पडत आहेत.
झाडांच्या बुंध्यांची राख होते तर त्यांच्या फांद्या व शेंड्याकडील भाग हिरवागार दिसत आहे. परंतु झाडांचा बुंधाच पेटला जाऊ लागल्याने ते निकामी होऊन काही झाडे उन्मळून पडली आहेत. अशा विकृत घटनांवर तत्काळ कठोर पाऊले उचलून कायदेशीर कारवाई केली गेली पाहीजे असे पर्यावरणप्रेमींचे मत व्यक्त होत आहे.