सातारा : व्यसनमुक्तीसाठी सोशल मीडियावर चित्रमय जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:58 PM2018-08-20T13:58:11+5:302018-08-20T14:01:23+5:30
लोकांना व्यसनांपासून दूर करण्यासाठी खंडाळ्यातील युवकाने चित्रांद्वारे सोशल मीडियावर प्रबोधन सुरू केले असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुकही होत आहे.
खंडाळा : का जडला हा रोग मजला, का जडली ही विदीर्ण व्याधी, दिसले माझे मरणच मजला, जीवन जगण्या आधी, आयुष्यातील विविध व्याधींचे मूळ हे व्यसन आहे. हीच व्याधी आपणास मरणाच्या दारात खेचून नेत असते.
वास्तविक याची जाणीव सर्वांनाच असते. मात्र, व्यसनापासून दूर व्हायला मन सहजासहजी धजावत नाही; पण लोकांना व्यसनांपासून दूर करण्यासाठी खंडाळ्यातील युवकाने चित्रांद्वारे सोशल मीडियावर प्रबोधन सुरू केले असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुकही होत आहे.
माणसांनी व्यसनमुक्त व्हावे, यासाठी अनेक सामाजिक संघटना काम करीत असतात. परंतु सर्वांचेच प्रयत्न फळाला येतात असे नाही. खंडाळ्यातील प्राणीमित्र रवींद्र पवार याने संगणकावरील चित्रमय कौशल्यातून व्यसनमुक्तीचे पाठ लोकांपुढे मांडले आहेत.
यामध्ये सिगारेट ओढणे, धूम्रपान करणे यामुळे शरीरावर होणारे विपरत परिणाम, दारू पिऊन घरावर येणारे संकट तसेच गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणे ते अलीकडच्या काळात
सेल्फी काढताना डोंगर कड्याावर उभे राहिल्याने घडणारे अनर्थ अशा विविध विषयांवर प्रकाश टाकला आहे.
विशेष म्हणजे व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते लाखो माणसांपर्यंत पोहोचले जात आहे. या चित्रांमधून तरुणांमध्ये प्रबोधन घडत आहे. तरुण वर्ग व्यसनांपासून दूर राहण्यासाठी याचा मोठा प्रभाव पडत आहे.
वास्तविक रवींद्र पवार याने प्राणीमित्र म्हणून वाईल्ड लाईफ संघटनेच्या माध्यमातून अनेक प्राणी-पक्ष्यांना जीवदान दिले आहे. मात्र, व्यसनाच्या आहारी चाललेल्या युवा पिढीला यापासून परावृत्त करण्यासाठी काहीतरी करायले हवे, असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने तो
प्रत्यक्षात साकारलाही. चित्रांच्या माध्यमातून त्याने युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत प्रबोधन सुरू केले असून, या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जग आधुनिकीकरणाकडे वाटचाल करीत असले तरी तरुण वर्ग व्यसनांकडे झुकत आहे. त्यांना व्यसनांपासून प्रवृत्त करणे गरजेचे आहे. या जाणिवेतून ही संकल्पना सूचली. अशा विविध चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्याचा विचार आहे. यातून लोकांमध्ये चांगला संदेश पोहोचेल.
- रवींद्र पवार,
प्राणीमित्र खंडाळा