भीषण आगीत सातारा-सोलापूर एस.टी.बस जळून खाक, धुळदेवजवळ दुर्घटना; अन् ४४ प्रवाशांचे जीव वाचले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 07:09 PM2022-02-05T19:09:44+5:302022-02-05T19:10:21+5:30
या घटनेमुळे सातारा-पंढरपूर मार्गावरील वाहतूक अर्धा तास बंद
म्हसवड : अचानक लागलेल्या आगीत सातारा आगाराची सोलापूर-सातारा एसटी बस जळून खाक झाली. म्हसवड येथून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या धुळदेव या ठिकाणी या एसटी बसच्या इंजिनमधून धूर येण्यास सुरुवात झाली. एसटीने अचानक पेट घेतल्याने एसटीचे मोठे नुकसान झाले. धूर येत असल्याचे लक्षात येतात चालक, वाहकानी प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाशांना खाली उतरुन सुरक्षित ठिकाणी हलविले. यामुळे ४४ प्रवाशांचे जीव वाचले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सातारा आगारातून शनिवारी सकाळी निघालेली सातारा-सोलापूर एसटी (एमएच ११ बीएल ९३५५) सोलापूरच्या दिशेने प्रवासी घेऊन रवाना झाली होती. बस म्हसवड बसस्थानकात येऊन येथे काही प्रवासी उतरले व त्यानंतर पुढील प्रवासास बस निघाली.
म्हसवडपासून पंढरपूरच्या दिशेला पाच किमी अंतरावर धुळदेव येथे दुपारी पावणे दोनच्या सुमारास आली असता एसटीच्या इंजिनमधून अचानक धूर यायला लागला. त्यानंतर बसने अचानक पेट घेतला. क्षणातच संपूर्ण एसटीने पेट घेतल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली.
ही बाब लक्षात येताच वाहक व चालकानी प्रसंगसावधान दाखवत एसटी रस्त्याच्या बाजूला उभी केली. त्यानंतर आतमील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. यामुळे कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. बसला आग लागल्याची माहिती स्थानिकांनी म्हसवड पालिकेला कळवताच तत्काळ म्हसवड पालिकेच्या आग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला.
आग आटोक्यात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे सातारा-पंढरपूर मार्गावरील वाहतूक अर्धा तास बंद होती. त्यामुळे पुढे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा काहीकाळ खोळंबा झाला होता. या घटनेची म्हसवड पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे.