सातारा : पावसाला प्रारंभ; धरणात आवक शुन्य, शिल्लक पाणीसाठ्यामुळे आशादायी चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 10:43 AM2018-06-11T10:43:34+5:302018-06-11T10:43:34+5:30
सातारा जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाला वेळेत प्रारंभ झाला असलातरी प्रमुख धरणात पाण्याची आवक अद्यापही सुरू झाली नाही. असे असले तरीही गतवर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे प्रमुख धरणात यंदा चांगला पाणीसाठा आहे. कोयना धरणात गतवर्षीपेक्षा दहा टीएमसी साठा अधिक असून धोम आणि कण्हेरमध्येही चांगला साठा शिल्लक आहे.
सातारा : जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाला वेळेत प्रारंभ झाला असलातरी प्रमुख धरणात पाण्याची आवक अद्यापही सुरू झाली नाही. असे असले तरीही गतवर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे प्रमुख धरणात यंदा चांगला पाणीसाठा आहे.
कोयना धरणात गतवर्षीपेक्षा दहा टीएमसी साठा अधिक असून धोम आणि कण्हेरमध्येही चांगला साठा शिल्लक आहे.
गेल्यावर्षी मान्सूनच्या पावसाला उशिरा सुरूवात झाली होती. त्यामुळे पावसाने जोम धरल्यानंतर २० जूनपासून धरणात पाण्याची आवक होऊ लागली होती. तर २०१६ साली पाऊस कमी झाल्यामुळे धरणात पाणीसाठा कमी होता. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे भरण्यास वेळ लागला.
गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यानंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर कोयनेसह इतर धरणे भरली. परिणामी पाणीपातळी नियंत्रीत करण्यासाठी कोयना धरणासह इतर धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.