सातारा : म्हसवडला निषेध फेरी अन् रास्ता रोको, पुतळा विटंबनाचे पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:38 PM2018-08-11T13:38:50+5:302018-08-11T13:41:48+5:30
पंढरपूर येथे थोर पुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ येथील काही सामाजिक संघटनांनी म्हसवड बंदची हाक दिली होती. त्यानुसार शनिवारी म्हसवड शहरातून निषेध रॅली काढून बसस्थानक चौकात रास्ता रोको केला. सातारा-पंढरपूर मार्ग काहीकाळ रोखून धरला.
म्हसवड (सातारा) : पंढरपूर येथे थोर पुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ येथील काही सामाजिक संघटनांनी म्हसवड बंदची हाक दिली होती. त्यानुसार शनिवारी म्हसवड शहरातून निषेध रॅली काढून बसस्थानक चौकात रास्ता रोको केला. सातारा-पंढरपूर मार्ग काहीकाळ रोखून धरला.
पंढरपूर येथे ९ आॅगस्टला काही समाजकंटकांनी थोर पुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच संबंधितांना शोधून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी. या मागणीसाठी काही सामाजिक संघटनांच्या वतीने शनिवारी म्हसवड बंद, मोर्चा व रास्ता रोको करण्यात आला.
येथील रिंगावण पेठ मैदानापासून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चा सिद्धनाथ मंदिर, शिवाजी चौक, रामोशी वेस, सातारा-पंढरपूर रस्त्यावरून बसस्थानक चौक ते शिंगणापूर चौकात आला. बसस्थानक चौकात निषेध सभा घेत रास्ता रोको करण्यात आला. यावेळी निषेध सभेत समाजकंटकांवर कडक कारवाई करून अशा घटना परत राज्यात होऊ नयेत, याची दक्षता राज्य शासन व पोलिसांनी घ्यावी, अन्यथा उग्र आंदोलने करावी लागतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी महेश लोखंडे, शिवाजी लोखंडे, भीमराव लोखंडे, दिलीप तुपे, धर्मराज लोखंडे, संभाजी लोखंडे, डॉ. प्रमोद गावडे, किशोर सोनवणे,अनिल लोखंडे, उमेश लोखंडे, जगन्नाथ लोखंडे, शहाजी लोखंडे, धनाजी तुपे, सदाशिव लोखंडे, बाबू लोखंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद
पुतळा विटंबना निषेधार्थ शनिवारी व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला. अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के बंद यशस्वी झाला. यावेळी म्हसवडचे सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी बंदोबस्त ठेवला होता.