Satara: तुमचे काम थांबवा..अन्यथा उडवून देऊ, आंदोलकांना उर्दू, मराठीमध्ये मेसेज; अज्ञातावर गुन्हा दाखल
By दत्ता यादव | Published: August 19, 2023 11:12 PM2023-08-19T23:12:45+5:302023-08-19T23:13:27+5:30
Satara: महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केल्याच्या निषेधार्थ सहभागी झालेल्या पाच आंदोलकांना ‘तुमचे काम थांबवा, अन्यथा तुम्हाला उडवून देऊ,’ असे उर्दू व मराठीमध्ये मेसेज आले आहेत.
- दत्ता यादव
सातारा - महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केल्याच्या निषेधार्थ सहभागी झालेल्या पाच आंदोलकांना ‘तुमचे काम थांबवा, अन्यथा तुम्हाला उडवून देऊ,’ असे उर्दू व मराठीमध्ये मेसेज आले आहेत. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञातावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वातंत्र्यदिनी एका अल्पवयीन मुलाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाला होता. संबंधित युवकाच्या स्टेटसवरही तो मजकूर होता. या प्रकाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कारवाईसाठी रास्ता रोको केला होता. या प्रकारामुळे शुक्रवारी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.
दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांच्या चिन्मय कुलकर्णी, गणेश अहिवळे, अमोल तांगडे, विक्रम जगदाळे, अविनाश कोळपे या पाच कार्यकर्त्यांना शुक्रवारी रात्री धमकीचे मेसेज आले. हे सर्व कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. या आंदोलकांना उर्दू व मराठीमध्ये मेसेज आले आहेत. ‘तुमचे काम थांबवा, अन्यथा तुम्हाला उडवून देऊ, ही शेवटची धमकी समजा. तुमचा नंबर एका मित्राने दिला असून, तुम्ही कुठला प्रोजेक्ट हाती घेतलाय, हे माहिती आहे.’
हा मेसेज पाहून सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यासमोर जमा झाले. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी संबंधितावर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानंतर पाच जणांच्या वतीने अमोल तांगडे (रा. सातारा) यांनी फिर्याद दिली असून, सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
ज्यांनी हे मेसेज पाठवले आहेत. त्यांच्यापर्यंत पोलिस लवकरच पोहोचतील. स्थानिक पातळीवरचा हा विषय असून, नागरिकांनी अफवा पसरवू नये. लवकरच यातील वस्तुस्थिती तपासात निष्पन्न होईल.
-महेंद्र जगताप
(पोलिस निरीक्षक, सातारा शहर)
साताऱ्यात सायबरचे तज्ज्ञ दाखल...
'प्लस ९२' हा पाकिस्तानचा नंबर असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. मात्र, हा प्रकार कोणीतरी खोडसाळपणे केला असावा, अशी शंका सायबर पोलिसांना आहे. पुणे, मुंबईहून सायबरची तज्ज्ञ टीम साताऱ्यात दाखल झाली असून, सातारा सायबर आणि पुण्या- मुंबईहून आलेल्या टीम संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.