सातारा : जिल्ह्यात कडकडीत बंद; प्रवाशांचे अतोनात हाल. आंबेडकरवादी जनतेचा सातारा शहरात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 14:19 IST2018-01-03T13:58:47+5:302018-01-03T14:19:04+5:30
सातारा जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड , फलटण, वाई या प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातही बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. करंजे (सातारा) येथे रिक्षाच्या काचा फोडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. याठिकाणी पोलिस आणि जमाव यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

सातारा : जिल्ह्यात कडकडीत बंद; प्रवाशांचे अतोनात हाल. आंबेडकरवादी जनतेचा सातारा शहरात मोर्चा
सातारा : जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड , फलटण, वाई या प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातही बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. करंजे (सातारा) येथे रिक्षाच्या काचा फोडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. याठिकाणी पोलिस आणि जमाव यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
मांढरदेव यात्रा तसेच यमाई यात्रेतील रथोत्सव यामुळे पोलिस फौजफाटा कमी असला तरी होमगार्डसच्या मदतीने जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त ठेवला असून, नागरिकांना शांततेचे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरेगाव-भीमा येथील तणावानंतर मंगळवारपासून सातारा जिल्ह्यातही तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. काही लोक अफवा पसरवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली नव्हती; पण तणावाची स्थिती लक्षात घेऊन तासाभरात शाळा सोडण्यात आल्या.
एसटी बसेस बंद राहिल्याने सातारा येथील मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवासी अडकून पडले होते. दरम्यान, आंबेडकरवादी जनतेने सातारा शहरात निषेधाच्या घोषणा देत मोर्चा काढला.
सातारा शहरातील करंजे पेठेतील बुद्ध विहार परिसरात बुधवारी सकाळी रिक्षाच्या काचा फोडणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. याठिकाणी जमाव पोलिस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. सातारा शहरात बंदचे आवाहन करत युवकांनी मोटारसायकल रॅली काढली.
कऱ्हाडात प्रशासनाच्या वतीने शांतता समितीची बैठक आयोजित करून प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी शांततेचे आवाहन केले. ओगलेवाडी, कऱ्हाड येथे झालेल्या तोडफोडीप्रकरणी शंभरच्यावर अनोळखी व्यक्तींवर शहर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून शांतता भंग केल्याप्रकरणी दोषींवर कारवाई सुरू केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पोलिस उपअधीक्षक खंडेराव धरणे यांनी सातारा शहरात फिरून लोकांना शांततेचे आवाहन केले. पार्थ पोळके व इतर कार्यकर्त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. सुरवडी (ता. फलटण) येथे घोषणाबाजी झाली. निंभोरेत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मागणीत निषेध मोर्चा काढण्यात आला. तरडगाव, कोयना भागातही कडकडीत बंद पाळण्यात आला.
ठळक घडोमोडी
- कऱ्हाडात शांतता समितीची बैठक
- बसस्थानकात प्रवासी अडकले
- शाळा महाविद्यालयांना तासाभरात सुटी
- बुद्धविहार (करंजे) येथे रिक्षा फोडली
- काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
- पोलिसांनी घेतली होमगार्डसची मदत