सातारा : प्राध्यापकांच्या संपाला विद्यार्थ्यांचा पाठिंबा, शिकविण्याचे काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:26 PM2018-09-25T13:26:35+5:302018-09-25T13:29:04+5:30
उच्च शिक्षणातील भरती बंदी आदेश रद्द करावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी एमपुक्टोच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या संपात जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक सहभागी झाले आहेत.
सातारा : उच्च शिक्षणातील भरती बंदी आदेश रद्द करावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी एमपुक्टोच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या संपात जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक सहभागी झाले आहेत. यामुळे वरिष्ठ महाविद्यालयातील शिकविण्याचे काम ठप्प झाले आहे. तर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी संपाला पाठिंबा दिला आहे.
तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना पूर्ण वेळ सहायक प्राध्यापकांएवढे मानधन देण्यात यावे, उच्च शिक्षणातील भरती बंदी आदेश रद्द करावा, ७१ दिवसांचे प्रलंबित वेतन तत्काळ देण्यात यावे, विद्यापीठ आयोगाच्या नियम व सूचनेप्रमाणे सातवा वेतन आयोग राज्यात लागू करावा, सर्वांना जुनी पेन्शन योजना लाग करावी, आदी मागण्यांसाठी मंगळवारपासून महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने (एमपुक्टो) राज्यात बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
या संपाला सातारा जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी सकाळपासूनच वरिष्ठ महाविद्यालयातील शिकविण्याचे काम बंद करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना माघारी जाणे भाग पडले. तसेच अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या या संपाला पाठिंबा दिला आहे.
जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांच्यासह इतर संस्थांचे प्राध्यापक या संपात सहभागी झाले आहेत. जिल्ह्यात या संपाला मोठा पाठिंबा मिळत असून, लवकरच पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार आहे, अशी माहिती ह्यसुटाह्णचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र चव्हाण यांनी दिली.