सातारा : नागझरीत विद्यार्थ्यांनी रोखली एसटी वाहतूक, आश्वासनानंतर आंदोलकांची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 03:28 PM2018-10-05T15:28:48+5:302018-10-05T15:32:46+5:30
सातारा-कान्हरवाडी एसटी नागझरी मार्गे सोडण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी नागझरी येथील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सकाळी रास्ता रोको केला. यावेळी विद्यार्थ्यांनी तीन एसटी रोखल्या. दरम्यान, पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
रहिमतपूर (सातारा) : सातारा-कान्हरवाडी एसटी नागझरी मार्गे सोडण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी नागझरी येथील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सकाळी रास्ता रोको केला. यावेळी विद्यार्थ्यांनी तीन एसटी रोखल्या. दरम्यान, पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, सातारा-कान्हरवाडी एसटी नागझरी मार्गे सोडण्यात यावी, सकाळची येणारी कोरेगाव-विटा ही बंद केलेली एसटी पुन्हा सुरू करावी, रहिमतपूर-नागझरी मार्गावर वेळी अवेळी सोडल्या जाणाऱ्या एसटींच्या फेऱ्या नियोजित वेळेनुसारच सोडाव्या या मागण्यांसाठी नागझरी येथील विद्यार्थ्यांनी सकाळी सातच्या सुमारास पुसेसावळी-रहिमतपूर मार्गावरील एसटीची वाहतूक रोखली.
आंदोलनाची माहिती मिळताच रहिमतपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. राज्य परिवहन महामंडळाच्या रहिमतपूर बसस्थानकातील अधिकाऱ्यांना फोनवरुन चर्चा करून दिली. पोलिसांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. सकाळी एसटी रोखल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या मागणीबाबत नागझरी ग्रामपंचायतीच्यावतीने यापूर्वी रहिमतपूर एसटी आगारप्रमुखांच्या बरोबर पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र या पत्रव्यवहाराची दखल न घेतल्यामुळेच आंदोलन झाले असल्याची माहिती आंदोलक विद्यार्थ्यांनी दिली.