सातारा : खासगी सावकारीला कंटाळून उपसरपंचाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 03:00 PM2018-08-18T15:00:36+5:302018-08-18T15:02:12+5:30
खासगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून फलटण तालुक्यातील होळच्या उपसरपंचांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री घडली.|
फलटण/जिंती (सातारा) : खासगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून फलटण तालुक्यातील होळच्या उपसरपंचांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री घडली. विनोद बबन भोसले (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या उपसरपंचांचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, होळ येथील उपसरपंच विनोद भोसले यांनी शुक्रवार, दि. १७ रोजी रात्री नऊच्या सुमारास जिंती खुंटे रस्त्यावरील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तेथून जाणाऱ्या लोकांच्या निदर्शनास आली. त्यांनी याची माहिती होळ व साखरवाडी भागातील लोकांना व ग्रामीण पोलीस ठाण्याला दिली.
पोलिसांनी अधिक तपास केला असता भोसले यांच्या खिशात चिठ्ठी सापडली. त्यामध्ये खासगी सावकारी करणाऱ्यांची नावे, रक्कम, त्यांचे मोबाईल नंबर लिहिलेले होते. विशेष म्हणजे या चिठ्ठीच्या चार झेरॉक्स प्रत त्यांनी काढून एक चिट्ठी शर्टमध्ये, एक पँटमध्ये, एक दुचाकीच्या डिकीत तसेच एक मोबाईलच्या कव्हरमध्ये ठेवली होती. मी खासगी सावकारकीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे विनोद भोसले यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे.
दरम्यान, चिठ्ठीच्या आधारे संबंधित खासगी सावकारांना अटक करा. त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली आहे. पोलिसांनी खासगी सावकारीबाबतीत गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने होळसह साखरवाडी परिसरातील लोकांनी पोलीस ठाण्याला घेरले. मात्र, त्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.