सातारचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह दोन अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 12:24 PM2024-08-14T12:24:08+5:302024-08-14T12:24:59+5:30
गडचिरोली येथे अडीच वर्षांपेक्षा जास्त काळ उत्कृष्ट सेवा
सातारा : गडचिरोली येथे अडीच वर्षांपेक्षा जास्त काळ उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह दोन पोलिस अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते या अधिकाऱ्यांना गाैरविण्यात येणार आहे.
पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह सातारा तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक नीलेश तांबे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमण यांचा पदक जाहीर झालेल्यांमध्ये समावेश आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना परिणामकारक आळा घालण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हे विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांनी गडचिरोली येथे नक्षलवाद्यांविरोधात आखलेल्या अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेऊन यशस्वी लढा दिला.
पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी गडचिरोली येथे ‘दादालोरा खिडकी’च्या माध्यमातून तेथील नागरिकांना वेगवेगळ्या योजना मिळवण्यासाठी ही योजना सुरू केली. यामुळे एकाच ठिकाणी तेथील नागरिकांना सुविधा मिळू लागल्या. त्यामुळे नागरिकांचे जीवनमान सुसह्य झाले. तसेच पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांनीदेखील नक्षलवाद रोखण्यासाठी चांगले प्रयत्न केले. अनेक नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास त्यांनी प्रवृत्त केले. याची दखल घेऊन शासनाने त्यांना विशेष सेवा पदक जाहीर केले.