सातारा : जीवाभावाचा सर्जा-राजा ट्रॅक्टरपुढं दुर्लक्षित, गरीब शेतकऱ्यांकडेच बैलजोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:33 PM2018-03-19T12:33:20+5:302018-03-19T12:33:20+5:30
खटाव तालुक्यातील शेतकरी आधुनिक यंत्र, तंत्रज्ञानाचा वापर करु लागले आहेत. त्यामुळे पुर्वीच्या काळात शेतकऱ्यांची शान असणारे व कुटुंबात मानाचे स्थान असणाऱ्या जीवाभावाच्या सर्जा-राजाचे अस्तित्व धोक्यात आले.
खटाव : खटाव तालुक्यातील शेतकरी आधुनिक यंत्र, तंत्रज्ञानाचा वापर करु लागले आहेत. त्यामुळे पुर्वीच्या काळात शेतकऱ्यांची शान असणारे व कुटुंबात मानाचे स्थान असणाऱ्या जीवाभावाच्या सर्जा-राजाचे अस्तित्व धोक्यात आले.
सध्याचे युग हे धकाधकीचे आहे. झटपट व घाईगडबडीच्या जमान्यात शेतकरीही काही कमी नाही व मागेही नाहीत. झटपट शेती करताना महनत कमी तसेच लवकर निकाल अशा पध्दतीने शेती करण्यासाठी शेतकरी यांत्रीक साधनांचा वापर करत आहेत.
पारंपरिक पध्दतीत बैल जोड्यांच्या साह्याने केली जाणारी शेती पध्दतीत बदल झाला. बैल जोड्यांच्या मदतीने केली जायची ती सर्व कामे आता ट्रक्टरच्या सहाय्याने कमी वेळेत होऊ लागली आहेत.
अधिक लगबगीने बहुतांश शेतकऱ्यांचा ओढा या अवजारांकडे जास्त असताना दिसुन येत आहे. ज्या गोठ्यात पुर्वी बैलजाडी उभी असायची त्याच जागेवर आता ट्रक्टर उभे आहेत. नांगरटी, पेरणी, मळणीपर्यंतची सर्व कामे ट्रक्टर करु लागला.
पूर्वीपासून शेतात कोणत्याही पिकाची मळणी शेणाने सारवलेल्या खळ्यात करताना ही मळणी महिनाभर चालायची. यासाठी बैलजोडीची आवश्यकता असते. मनुष्यबळही तितकेच लागत असे. बदलत्या काळानुसार शेतीच्या संकल्पनाही बदलल्या.
आता याच जागावर आधुनिक यंत्रांनी आपला कब्जा केला आहे. मळणी यंत्राणे ही जागा घेतल्याने शेतकऱ्यांनी या खळ्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता शिवारात सर्जाराजाच्या नावाने ऐकु येणारी हाक कमी होउन मळणी यंत्राच्या आवाजाने ती जागा घेतली आहे. शेतकऱ्यांची सुगी आता एका दिवसात घरी येऊ लागली आहे.