सातारा ‘स्वाभिमानी’ला फलटण, ‘रासप’ला माण
By Admin | Published: September 1, 2014 10:59 PM2014-09-01T22:59:44+5:302014-09-01T23:02:15+5:30
महायुती जागावाटप : बाकीच्या सहा मतदारसंघांचा निर्णय प्रतीक्षेत
सातारा : माण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाकडे, तर फलटण विधानसभा मतदारसंघ स्वाभिमानी पक्षाला मिळणार असल्याचे आज, सोमवारी स्पष्ट झाले. ‘रासप’चे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला, तर ‘स्वाभिमानी’चे सदाभाऊ खोत यांनी या अनुषंगाने बोलण्याचे टाळले. दरम्यान, माण आणि फलटणचा विषय निकालात निघाल्यामुळे आता जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपकडे कोणते मतदारसंघ राहणार याकडेही अनेकांच्या नजरा आहेत.
जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. ‘रासप’ आणि ‘स्वाभिमानी’ महायुतीचे घटक पक्ष आहेत. गत निवडणुकीत हे दोन्ही पक्ष सेना-भाजपबरोबर नव्हते. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत जागावाटपाच्या अनुषंगाने गेले काही दिवस बैठका सुरू आहेत. ‘रासप’ने माण, फलटण तर ‘स्वाभिमानी’ने फलटण, कोरेगाव, कऱ्हाड दक्षिण आणि कऱ्हाड उत्तर या चार विधानसभा मतदारसंघांवर दावा केला होता. त्यातच भाजपने पूर्वीचे तीन आणि नव्याने दोन असे पाच मतदारसंघ मागितले होते. परिणामी महायुतीतील जागावाटपाचा ‘गोंधळात गोंधळ’ सुरूच होता.
पहिल्या टप्प्यात ‘रासप’ आणि ‘स्वाभिमानी’मध्ये असणारा /सातारा जिल्ह्यातील अंतर्गत विषय निकालात काढण्यात काही प्रमाणात दोन्ही पक्षांच्या नेत्यांना यश आले आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या दोन्ही मतदारसंघांवर ‘स्वाभिमानी’ ठाम होती. मात्र, जानकर यांनी जागावाटप करताना ‘स्वाभिमानी’ला जर पंढरपूर हवा असेल, तर फलटण सोडावा लागेल आणि फलटण हवा असेल, तर पंढरपूर सोडावा लागेल, अशी भूमिका मांडली. त्यामुळे ‘स्वाभिमानी’च्या नेत्यांनी पंढरपूर सोडत फलटणला प्राधान्य दिल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले.
चारही इच्छुकांशी चर्चा झालीय : जानकर
‘माण विधानसभा मतदारसंघामधून ‘रासप’ची उमेदवारी मिळावी म्हणून माजी आमदार सदाशिवराव पोळ, जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई, शेखर गोरे, रणजितसिंह देशमुख यांनी भेट घेऊन चर्चा केली होती. माण आता आम्हालाच मिळणार असल्यामुळे आम्ही आमचा उमेदवार लवकरच जाहीर करू,’ असे महादेव जानकर यांनी सांगितले.
आगवणेंच्या छातीवर ‘स्वाभिमानी’चा बिल्ला
फलटण येथील काँग्रेसचे कार्यकर्ते दिगंबर आगवणे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करणार असल्याची माहिती ‘स्वाभिमानी’चे नेते सदाभाऊ खोत यांनी दिली. फलटण येथे उद्या, मंगळवारी, सायंकाळी शेतकरी मेळावा होत असून, येथेच आगवणे यांचा प्रवेश होणार आहे. दरम्यान, ‘आगवणे स्वाभिमानी पक्षात नव्हे, तर आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करीत असल्याची बाब लक्षात घ्या,’ असे सांगण्यासही खोत विसरले नाहीत.