सातारा : दीड हजाराची लाच घेताना तलाठी जाळ्यात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले रंगेहाथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 04:50 PM2018-10-04T16:50:48+5:302018-10-04T16:53:32+5:30
विहीर पाणी हक्काची नोंद घेऊन तसा सातबारा उतारा देण्यासाठी दीड हजार रुपयाची लाच स्वीकारताना गुरुवारी दुपारी दोन वाजता वडले, ता. फलटण येथील तलाठी दत्तात्रय रामचंद्र धुमाळ (वय ४०) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
सातारा : विहीर पाणी हक्काची नोंद घेऊन तसा सातबारा उतारा देण्यासाठी दीड हजार रुपयाची लाच स्वीकारताना गुरुवारी दुपारी दोन वाजता वडले, ता. फलटण येथील तलाठी दत्तात्रय रामचंद्र धुमाळ (वय ४०) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांच्या पत्नीने विहीर पाणी हक्काचे कायम खूशखरेदी खत केले होते. त्याची नोंद घेऊन तसा सातबारा देण्यासाठी तलाठी दत्तात्रय रामचंद्र धुमाळ (वय ४०, रा. अक्षता रेसिडन्सी, जाधववाडी, ता. फलटण) याने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली.
तलाठ्याने लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला यांच्या पथकाने फलटण शहरातील गजानन चौकात सापळा रचला.
दुपारी तलाठी धुमाळ याने तक्रारदाराकडून तडजोडीअंती दीड हजार रुपयाची लाच स्वीकारून सातबारा दिला. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. तसेच फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.