Satara: कराडच्या माजी नगराध्यक्षांनी घेतली हातात 'तुतारी'! शशिकांत शिंदेंनी घेतली भेट
By प्रमोद सुकरे | Published: April 21, 2024 10:17 AM2024-04-21T10:17:29+5:302024-04-21T10:18:36+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: कराडचे माजी नगराध्यक्ष व भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांचे निकटवर्तीय असणाऱ्या जयवंतराव पाटील यांनी चक्क महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे.
- प्रमोद सुकरे
सातारा - कराड तालुका हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या या कर्मभूमीतील घडामोडींकडे नेहमीच सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असते. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही कराड शहर व तालुक्यात घडामोडी सुरू झाल्या आहेत. त्यातील एक महत्त्वाची घडामोडी म्हणजे कराडचे माजी नगराध्यक्ष व भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांचे निकटवर्तीय असणाऱ्या जयवंतराव पाटील यांनी चक्क महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी त्यांनी शहरात शशिकांत शिंदे यांच्या पाठिंबाचे लावलेले फ्लेक्स लोकांच्या नजरेला पडले आणि राजकीय वर्तुळात त्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात शहरातील मतदारांची भूमिकाही नेहमीच महत्त्वपूर्ण ठरत आली आहे. कराड शहरात सुमारे ६५ हजारावर मतदार आहेत. त्यामुळे शहरातील नेते, प्रमुख कार्यकर्ते काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरत असते.
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. महायुतीकडून खासदार उदयनराजे भोसले तर महाविकास आघाडीकडून आमदार शशिकांत शिंदे यांनी शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल केले आहेत.आता दोघांनीही पायाला भिंगरी बांधली असून मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. तेथून त्यांना प्रतिसादही मिळत आहे.
पण कराडचे माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी त्यांच्याकडे उमेदवार शशिकांत शिंदे भेटीला येण्यापूर्वीच आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी शशिकांत शिंदे यांना पाठिंबा देणारे लावलेले फ्लेक्स राजकीय वर्तुळात चर्चेचे ठरले आहेत. डॉ. अतुल भोसले यांचे निकटवर्ती असणाऱ्या जयवंतराव पाटलांनी 'तुतारी' कशी काय हातात घेतली याची चर्चा आता जोरदार सुरू आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे शुक्रवारी दुपारी कराड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्या निवासस्थानी आवर्जून भेट दिली. जिल्ह्यात पहिल्यांदा तुम्ही न मागता मला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली त्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी कराड उत्तरचे आमदार, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, कराडचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष डुबल व शहरातील अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते. त्यानंतर शशिकांत शिंदे यांनी जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव यांच्या निवासस्थानीही सदिच्छा भेट दिली.यावेळी माजी नगराध्यक्षा शारदा जाधव व अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते.