सातारा : सिव्हिलला तीन कोटींचं मशीन येणार, सीटी स्कॅनसाठी रुग्णांना पडत होता आर्थिक भुर्दंड, रुग्णांची ससेहोलपट थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 05:14 PM2018-01-24T17:14:49+5:302018-01-24T17:24:08+5:30
गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांची होणारी ससेहोलपट आणि आर्थिक पिळवणूक थांबणार आहे. तब्बल तीन कोटींचं सीटी स्कॅनचं मशीन लवकरच रुग्णांच्या सेवेसाठी दाखल होत असून, मशीन येण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
सातारा : गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांची होणारी ससेहोलपट आणि आर्थिक पिळवणूक थांबणार आहे. तब्बल तीन कोटींचं सीटी स्कॅनचं मशीन लवकरच रुग्णांच्या सेवेसाठी दाखल होत असून, मशीन येण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये सीटी स्कॅनचे मशीन होते. मात्र, पाच वर्षांपूर्वी या मशीनला राजकीय आजारपणामुळे कऱ्हाडला हलविण्यात आले. तेव्हापासून सिव्हिलमध्ये सीटी स्कॅनचे मशीन नाहीच. रोज कुठे ना कुठे तरी अपघात होत असतातच.
सिव्हिलमध्ये दाखल झालेल्या रुग्णाचे सीटी स्कॅन करणे गरजेचे असते. सध्या रुग्णालयात मशीन नसल्यामुळे रुग्णांना खासगी दवाखान्यामध्ये जावे लागते. या ठिकाणी चार ते पाच हजार रुपये रुग्णांना मोजावे लागतात. गोरगरीब रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे लोकमतने अनेकदा वृत्त प्रसिद्ध केले होते. इतर मशीनस् प्रमाणे सीटी स्कॅन मशीन गरजेचे असताना रुग्णालय प्रशासनाचा कानाडोळा होत असल्याचे लोकमतने निदर्शनास आणले होते.
या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांनी राज्य शासनाकडे सीटी स्कॅनसाठी प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली असून, तीन कोटींचे मशीन लवकरच जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल होणार आहे.
दोन दिवसांपूर्वी सीटी स्कॅनचे मशीन कोठे ठेवायचे, त्याची मापे प्रशासनातील अधिकारी घेऊन गेले आहेत. येत्या काही दिवसांत हे मशीन रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे.